जादा परताव्याचे अमीष दाखवून 4 कोटी 16 लाख रुपयांची फसवणूक!

पिंपरी : शेअर मार्केट व भिशी मध्ये चार ते पाच टक्के ज्यादा परताव्याचे आमीष दाखवून फिर्यादी आणि अन्य नागरिकांची सुमारे 4 कोटी 16 लाख 20 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. ही घटना 15 मे 2023 ते 7 मार्च 2026 या कालावधीत माण, ता. मुळशी येथे घडली.

एका व्यक्तीने याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून रमेश पुंजाजी आहेरकर, महिला आरोपी ,वेदांत रमेश आहेरकर, आदित्य रमेश आहेरकर (फ्लॅट नंबर 302, शुभारंभ रेसिडेन्सी, दत्त मंदिराजवळ माण, ता. मुळशी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी आणि इतर गुंतवणूकदारांना चार ते पाच टक्के जास्तीचा परतावा देण्याचे आमीष दाखवून शेअर मार्केट व भिशीमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. फिर्यादी यांचे 57 लाख 6 हजार आणि इतर गुंतवणूकदारांकडून तीन कोटी 59 लाख 14 हजार 892 रुपये असे एकूण 4 कोटी 16 लाख 20 हजार रुपये ठेव स्वरूपात स्वतःकडे ठेवून त्यावर कोणताही परतावा तसेच गुंतवणूक केलेली रक्कम परत न करता फसवणूक केली आहे. हिंजवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पांचाळ हे पुढील तपास करत आहेत.

