लाईफटाईम मेंबरशिपच्या आमिषाने २९ लाखांची फसवणूक!

पिंपरी : एका कंपनीच्या नावाने लाईफटाईम मेंबरशिप आणि ट्रॅव्हल पॅकेजच्या आमिषाने ३९ लोकांची २९ लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक केली. ही घटना सन २०२३ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत कोकणे चौक, रहाटणी येथे घडली. या प्रकरणी श्रीकांत प्रकाश भावसार (वय ३७, वाकड) यांनी काळेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
काळेवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोवनिर इंटरनॅशनल प्रा.लि कंपनीचे सनी सोनावणे, गणेश पोपळघाट, विशाल दिवाण, मनोज वाल्मिकी, करण शर्मा, मिना शिंदे, आशिष जगताप, पायल दळवी, पल्लवी गावडे, आकाक्षा देशमुख, नागेश साळवी, आयेशा शेख आणि कंपनीचे इतर कर्मचारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्यासारख्या ३९ लोकांना लाईफटाईम मेंबरशिप आणि लाईफटाईम ट्रॅव्हल पॅकेज देण्याचे आमिष दाखवले. वेगवेगळया आकर्षक ऑफर देऊन, बनावट अॅग्रीमेंट बनवून फिर्यादी आणि ३९ लोकांची एकूण २९ लाख १६ हजार ५०० रुपयांची फसवणूक केली आहे.

घरगुती सामान बिहारला पोहोचविण्याच्या बहाण्याने फसवणूक!
पिंपरी : घरगुती सामान पुण्यातून बिहारला पोहोचवतो, असे सांगून १२ हजार रुपये घेऊन सामान न पोहोचवता एका व्यक्तीची फसवणूक करण्यात आली. ही घटना २६ जून रोजी एक्झरबिया सोसायटी नेरे दत्तवडी येथे घडली. या प्रकरणी एका महिलेने हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अनुकल्प कुमार ओझा आणि एका वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला मूळच्या बिहार येथील आहेत. त्यांना पुणे शहरातून काही घरगुती सामान बिहार येथे न्यायचे होते. त्यामुळे त्यांनी आरोपी अनुकल्प याच्याशी संपर्क केला. आरोपीने फिर्यादीला त्यांचे घरगुती सामान पुण्यातून बिहारला पोहोचवतो, असे सांगितले आणि त्यासाठी १२ हजार रुपये घेतले. मात्र, ते सामान फिर्यादीच्या बिहार येथील घरी न पोहोचवता त्यांची फसवणूक केली.

