जादा नफ्याच्या आमिषाने साडे चौदा लाखांची फसवणूक!

चिखली पोलिसात गुन्हा दाखल
पिंपरी : शेअरमध्ये जादा नफा मिळविण्याचे आमिष दाखवून चिखली-जाधववाडी, शिवरस्ता येथील एकाची १४ लाख ४२ हजार २५४ रुपयांची फसवणूक झाल्याची बाब समोर आली आहे. याप्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला .
राजुराम भवरलाल चौधरी (३५, रा. जाधववाडी, चिखली) यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार, पोलिसांनी शुक्रवारी (दि. २१) अमित, डॉ. चिराग, धवल शहा, धवल शहाचा बॉस, वरुण, संदीप आणि वासुभाई (पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही.) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबतची घटना अशी, भवानी इंटरप्रायजेस या शेअर मार्केट ट्रेडिंग कंपनीच्या नावाने १० हजारांची गुंतवणूक केल्यास १० लाख रुपयांचे शेअर खरेदी-विक्री करण्याची लिमिट भेटेल, अशी खोटी स्कीम आरोपींनी सांगितली. मोबाईल व व्हॉटसअपद्वारे फिर्यादीच्या संपर्कात राहून त्यांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने शेअर मार्केटमध्ये ऑप्शन ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतविल्यास जास्त नफा मिळेल, असे आमिष दाखविले.
शेअर मार्केटमध्ये बनावट नावाने, अकाउंट उघडले. फिर्यादीला खोटा सल्ला देऊन कोणत्याही शेअरची प्रत्यक्ष खरेदी विक्री केली नाही. फिर्यादीला फायदा झाला असल्याचा खोटा आठवड्याचा अहवाल पाठविला. तसेच, हा नफा मिळविण्यासाठी ब्रोकर, जीएसटी शुल्क, इतर चार्जेस अशा कारणांसाठी पैसे पाठविण्याची मागणी केली. पैसे न पाठविल्यास शेअर मार्केटचे खाते बंद होईल. त्यातील नफ्याचे पैसे फिर्यादीला कधीही मिळणार नाही. तसेच, अकाउंटमधील शेअरची खरेदी-विक्री करता येणार नाही, असे भय दाखविले. तसेच, फिर्यादीची १४ लाख ४२ हजारांची फसवणूक केली.