पैसे जमा झाल्याचा मेसेज पाठवून केली फसवणूक!

पिंपरी : माझ्या भावाने तुमच्या अकाऊंटवर पैसे पाठविले आहेत. ते मला गुगल पे वर पाठवा, असे सांगत पैसे जमा झाल्याचा खोटा मेसेज पाठवून एका नागरिकाला ५० हजार रुपये पाठविण्यास सांगून त्यांची फसवणूक केली. ही घटना रावेत येथे बुधवारी घडली. महेश सुरेश भोंडवे (वय ३८, रा. शिंदेवस्ती, रावेत) यांनी याबाबत गुरुवारी याबाबत रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
रावेत पोलिसांनी एका मोबाइलवरून बोलणार्या अनोळखी चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी हे चापेकर चौक, चिंचवड येथून आपल्या घरी येत असताना त्यांना फोन आला. समोरुन एकजण हिंदीमध्ये बोलू लागला की, कैसे हो महेश भाई? पहचाना क्या? रावेत कब आने वाले हो.तेव्हा फिर्यादी यांना वाटले की, कोणतरी त्यांच्या ओळखीचा व्यक्ती आहे. समोरुन अनोळखी इसम फिर्यादी यांना म्हणाला की, माझी आई हॉस्पीटलमध्ये आहे. मी पण हॉस्पीटलमध्ये आहे. माझा भाऊ तुमच्या अकाऊंटवर पैसे पाठवले ते पैसे मला द्या, असे म्हणून फिर्यादी यांना पैसे पाठवल्याचे मॅसेज पाठवून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादी भाेंडवे यांनी आरोपीच्या गूगल पे वर थोड थोडे करुन एकूण ५० हजार रुपये ऑनलाइन पाठवले.

जमिनीवर अतिक्रमण; दोघांवर गुन्हा!
पिंपरी : लोखंडी कंटेनर इतरांच्या जागेत ठेवून अतिक्रमण करीत जागेचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (दि. १७) सायंकाळी वाकड येथे घडली.
संकेत सज्जन रावडे (वय ३१) आणि आशिष उबाळे (वय ३५) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. संदीप रूस्तम आबदार (वय ४७, रा. खराडी, पुणे) यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास आरोपींनी फिर्यादी हे काम करीत असलेल्या एल. एल. पी. या कंपनीच्या जागेत लोखंडी कंटेनर आणून ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र फिर्यादी व इतर कामगारांनी त्यांना विरोध केला असता त्यांना धमकी देत कंटेनर ठेवत जागेवर अतिक्रमण केले. वाकड पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.