जातीच्या कारणावरून व्यवहारास नकार देत फसवणूक

पिंपरी : पिंपरी परिसरात एका व्यक्तीने जमीन खरेदीच्या व्यवहाराच्या नावाखाली ३० लाख रुपये घेऊन फसवणूक केली आणि जातीवरून अपशब्द वापरून व्यवहार करण्यास नकार दिला. ही घटना २८ एप्रिल ते २७ मे २०२५ या कालावधीत पिंपरीतील ॲडव्होकेट पांडुरंग निंबाळकर यांच्या कार्यालय आणि रहाटणी येथील श्री रामनिवास तलाठी यांच्या कार्यालयाजवळ घडली.

याप्रकरणी ४१ वर्षीय व्यक्तीने पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रोहन नवनाथ साळुंके (वडज, जुन्नर, पुणे), गणेश बाळू उर्फ बाळासाहेब शिंदे (रहाटणी, पुणे) आणि तीन महिला आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या भागीदाराकडून जागा खरेदी करण्याच्या बहाण्याने नोटरीमध्ये विसार पावती तयार केली आणि ३० लाख रुपये घेतले. त्यानंतर फिर्यादी खालच्या जातीचे असल्याचे सांगून आरोपींनी त्यांच्याशी केलेला व्यवहार दुसऱ्याच व्यक्तीशी केला आणि त्यांची फसवणूक केली. तसेच, ते खालच्या जातीचे असल्याचे कारण देत त्यांच्याशी व्यवहार करण्यास नकार दिला. याबाबत फसवणूक आणि ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस आयुक्त सचिन हिरे तपास करीत आहेत.