चांदीच्या कड्याला सोन्याचा मुलामा देऊन फसवणूक!

पिंपरी : चिंचवड येथील न्यू सोनिगरा ज्वेलर्स दुकानात एका व्यक्तीने सोन्याचे कडे विकण्याच्या बहाण्याने चांदीच्या कड्याला सोन्याचा मुलामा देऊन दुकानाच्या मालकाची १ लाख ३० हजारांची फसवणूक केली. ही घटना १२ जुलै रोजी दुपारी घडली. या प्रकरणी २८ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमोल सुभाष बलदोटा (वय ३३, धनकवडी, पुणे) याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी अरविंद पनराज सोनिगरा (वय ५१, चिंचवडगाव) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीच्या दुकानात येऊन सोन्याचे कडे विकायचे असल्याचे सांगितले. त्याने चांदीच्या कड्याला सोन्याचा मुलामा देऊन ते सोन्याचे कडे आहे असे भासवून फिर्यादीकडून १ लाख ३० हजार रुपये घेतले आणि त्यांची फसवणूक केली. चिंचवड पोलिस तपास करत आहेत.

लग्नाचे आमिष दाखवून महिलेची फसवणूक
पिंपरी : एका तरुणाने महिलेशी मैत्री करून लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले आणि नंतर जातीवरून अपमान करत लग्न करण्यास नकार दिला. ही घटना मार्च २०२५ ते ८ ऑगस्ट २०२५ या दरम्यान घडली. २८ ऑगस्ट रोजी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी २४ वर्षीय महिलेने हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. तर सुनील शालिकराम पराळे (वय २६, मारुंजी, हिंजवडी) याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि आरोपी एकाच कंपनीत काम करतात. आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन करून तिला लग्नाचे आमिष दाखवले. तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर आरोपीने “तुझी जात वेगळी आहे” असे म्हणत तिच्याशी लग्न करण्यास नकार देऊन तिची फसवणूक केली. हिंजवडी पोलिस तपास करत आहेत.