भजनासाठी आलेल्या महिलांचे दागिने चोरणाऱ्या चार महिलांना अटक!

पिंपरी : भंडारा डोंगराच्या पायथ्याशी भजनाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या भाविक महिलांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या चार महिलांना दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये पोलिसांनी जेरबंद केले आहे. या कारवाया शनिवार 31 जानेवारी दुपारी एकच्या सुमारास सुदवडी गावच्या हद्दीत करण्यात आल्या.

माया सुहास गुरव (वय 45, डोळसनाथ मंदिराजवळ तळेगाव दाभाडे )यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .पोलिसांनी वत्सला संपत गायकवाड (वय 35, एकनाथवाडी, पाथर्डी, अहिल्यानगर) आणि कस्तुरबाई भागवत लोखंडे (वय 45, एकनाथवाडी पाथर्डी अहिल्यानगर) यांना अटक केली आहे .पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी आणि आरोपी हे तोंड ओळखीचे असून ते भजनाच्या कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी आरोपींनी संगणमत करून फिर्यादीच्या गळ्यातील आणि इतर महिलांचे असे एकूण 47 ग्रॅम वजनाचे दोन लाख 82 हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले. ही बाब उघडकीस येतात पोलिसांनी तात्काळ महिलांचा शोध घेत त्यांना अटक केली.
दुसऱ्या प्रकरणात शांताबाई दत्तात्रय चव्हाण (वय 66, इंदोरी, मावळ) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गौळण पांडुरंग गायकवाड (वय 40, रा. माऊली नगर बीड) आणि प्रीती अंबादास मोहिते (वय 32, काळेवाडी यांना अटक केली आहे. आरोपींनी भजनाच्या कार्यक्रमात गर्दीचा फायदा घेऊन फिर्यादी आणि इतर महिलांच्या गळ्यातील 62 ग्रॅम वजनाचे तीन लाख 72 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.

