`शिवरंजनी`चे संस्थापक प्रकाश नवले यांचे निधन

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
ठाणे, प्रतिनिधी : ठाण्यातील शिवरंजनी संस्थेचे संस्थापक आणि ज्येष्ठ संगीतकार श्री. प्रकाश वामन नवले यांचे आज (शुक्रवार) अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी अनुसया, मोठा मुलगा मयूर आणि सून प्रगती, छाकटा मुलगा तबला वादक रवी नवले, सून निशा आणि नातवंडे असा परिवार आहे.
संत कबीर आणि त्यांचे दोहे या विषयावर श्री. प्रकाश नवले यांचा गाढा अभ्यास होता. या अभ्यासातून त्यांनी कमावलेले ज्ञान अतुलनीय आणि अद्वितीय होते. अशा गुरुतुल्य व्यक्तिमत्त्वाच्या निधनामुळे केवळ संगीतक्षेत्रातच नव्हे तर कला आणि साहित्य क्षेत्रातही खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे. श्री. प्रकाश नवले यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अनेक विद्यार्थी घडविले. त्यांच्या निधनामुळे पोरके झाल्याची भावना या क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी व्यक्त केली आहे.
श्री. प्रकाश नवले यांनी १९९८ मध्ये शिवरंजनी संस्थेची स्थापना केली. शास्त्रीय संगीतातील भारतभरातील नामवंत कलाकारांनी शिवरंजनीच्या व्यासपीठावरून रसिकांपर्यंत आपल्या कलेचे सादरीकरण केले आहे. नवोदित कलाकारांना व्यासपीठ देणे, नामवंत कलाकारांच्या मैफली आयोजित करुन कलाप्रेमींची, रसिकांची सांगितिक इच्छा पूर्ण करणे अशा अनेक एका पेक्षा एक सरस उपक्रमांमध्ये शिवरंजनी संस्था नेहमीच अग्रेसर असते.
कोविड काळात जगभरात सगळ्याच व्यवहारांना टाळे लागले होते. या सगळ्या प्रसंगाला धीराने सामोरे जात श्री. प्रकाश नवले यांच्या मार्गदर्शनाखाली शिवरंजनी संस्थेने ऑनलाइन संगीत वर्ग सुरू केले आणि मैफली सुद्धा ऑनलाइन भरविल्या. जेणेकरून कलाकार आणि रसिक यांच्यातले वाढत गेलेले अंतर कमी व्हावे आणि कोविडमुळे दुरावलेले रसिक, कलाकार पुन्हा एकदा ऑनलाइनमुळे व्हर्च्युअल माध्यमातून जोडले जावेत. अशा मैफलींना रसिकांनी भरभरून दाद दिली. हीच त्यांची संगीतासाठीची तळमळ अखेरच्या श्वासापर्यंत कायम होती. ठाण्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर, उद्योजक, कलाकार यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.