चिनी कंपनीचा बनावट ई-मेल ;55 लाख रुपयांची फसवणूक!

पिंपरी : चिनी कंपनीच्या नावाने बनावट ई-मेल आयडी वापरून 55 लाख 25 हजार 974 रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. ही घटना दोन ते सहा एप्रिल दरम्यान भोसरी एमआयडीसीतील एका नामांकित कंपनीत उघडकीस आली आहे.

या याप्रकरणी संजय बाबुराव जाधव (वय 40, रा. यशवंतनगर, तळेगाव दाभाडे) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादीची कंपनी चीनमधील ‘बेंझू आर्टेक’ मशिनरी टेक्नॉलॉजी या कंपनीकडून कच्चामाल खरेदी करते. अज्ञात आरोपीने या कंपनीचा अधिकृत ई-मेल आयडी असल्याचा भास निर्माण करून मेल पाठवला. संबंधित मेलमध्ये बँक खात्याचा तपशील बदलण्याचे सांगून अमेरिकेतील सिटीझन बँकेचा खाते क्रमांक देण्यात आला. कंपनीने त्यावर विश्वास ठेवून 59 हजार 179.78 अमेरिकन डॉलर्स त्या खात्यात वर्ग केले. नंतर व्यवहार संशयास्पद वाटल्याने चौकशी केली असता फसवणूक उघडकीस आली. भोसरी एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत.

