का लांबणीवर जातायत निवडणुका?

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : राज्यात गेल्या चार वर्षांपासून सातत्याने लांबणीवर पडत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडत आहेत. येत्या दोन महिन्यात अपेक्षित असलेल्या निवडणुका लगेच होतील, याबाबत शाश्वती नाही.
ओबीसी आरक्षणाचा मुद्दा रखडल्याने राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडे याबाबत निर्णय घेण्याची विनंती केली होती. त्यातच न्यायालयात काल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासंदर्भात न्यायालयात धाव घेतली गेली. ओबीसी आरक्षण असो वा नसो पण निवडणुका व्हाव्यात, अशी मागणी या याचिकाकर्त्यांनी केली आहे. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकर व्हाव्यात यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेवर आल्याबरोबर दिले होते. या प्रकरणाची सुनावणी लवकरात लवकर घ्यावी, अशी विनंती असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर स्थानिक स्वराज्य संस्थांचे भवितव्य अवलंबून असणार आहे. राज्यातल्या २९ महापालिका, २५७ नगरपालिका, २६ जिल्हा परिषदा आणि २८९ पंचायत समित्यांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे आता राज्यभरातून सगळ्यांचं लक्ष आहे. राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र, पुन्हा निवडणुका लांबणीवर जात असल्यामुळे आता पुढे काय हा प्रश्न निर्माण झाला आहे.