दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या आठ आरोपींना अटक!

आळंदी : दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या आठ आरोपींना अटक करण्यात आली असून यामध्ये तीन अल्पवयीन बालक आहेत. ही कारवाई शुक्रवार 10 एप्रिल रोजी रात्री साडेतीनशे सुमारास मौजे धानोरे, ता. खेड, जि. पुणे येथील पॉलीबोड कंपनीच्या समोर करण्यात आली.

याप्रकरणी संदीप लक्ष्मण दोडके (वय 42, पोलीस हवालदार, आळंदी पोलीस ठाणे यांनी आळंदी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे .यानुसार मोहम्मद इब्राहिम अनिस चौधरी (वय 19, रा. कुदळवाडी, चिखली), जीशान मोहम्मद साहीर सय्यद खान (वय 18, रा. बालघरे वस्ती, कुदळवाडी, चिखली), जमाल आशिक अली हाश्मी (वय 19, रा. मोरे पाटील चौक, कुदळवाडी), शिवकुमार निरंजन चौहान वय 19, रा. मोरे चौक, कुदळवाडी), सलमान जुबेर बागवान (वय 18, रा. मोरे पाटील चौक, कुदळवाडी, चिखली) अशी अटक केलेल्या पाच आरोपींची नावे आहेत. याशिवाय तीन अल्पवयीन बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आळंदी ते मरकळ रोडवरील पॉलिबोड कंपनीच्या समोर धानोरे गावचे हद्दीत ता. खेड येथे लाईटच्या अडोशास दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या आणि दबा धरून बसलेल्या आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून नऊ मोबाईल फोन, चार लोखंडी कोयते, एक टाटा कंपनीचा छोटा हत्ती, एक स्प्लेंडर प्लस, एक जुपिटर, एक्टिवा, नायलॉनची रस्सी असे एकूण लाख 44 हजार 965 रुपये किमतीचे साहित्य ताब्यात घेण्यात आले. आळंदी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दुधमल हे तपास करत आहेत.

