आणखी दोन दिवस पावसाचा जोर

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : राज्यात सध्या परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडतो आहे. उत्तर कोकणपासून दक्षिण बांगलादेशपर्यंत हवेच्या कमी दाबाचा आस निर्माण झाला आहे. कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी होऊन छत्तीसगडवर हवेची चक्रीय स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस उत्तर मध्य महाराष्ट्र, उत्तर किनारपट्टी, उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर राहणार आहे. पालघर, नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर कोकणापासून दक्षिण बांगलादेशपर्यंत हवेच्या कमी दाबाचा आस निर्माण झाला आहे. मंगळवारी (२५ सप्टेंबर) ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीनजीक तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी होऊन छत्तीसगडवर हवेच्या वरच्या थरात वाऱ्याची चक्रीय स्थिती तयार झाली आहे. ही स्थिती कमी दाबाच्या आसावर आहे. त्यामुळे उत्तर मध्य महाराष्ट्र, उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात वादळी वारे, मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
मुंबईमध्ये आज रेड अलर्ट जारी करण्यात आला असून शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.मुंबईत तर पावसाचा रौद्रावतार रात्री उशिरापर्यंत सुरू होता. सकाळी काही काळ विश्रांतीनंतर सकाळी ११ नंतर पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. तर पुण्यातही पुढील दोन दिवस पावसाचा मुक्काम कायम राहणार असून हवामान विभागाने पुणे जिल्ह्याला देखील रेड अलर्ट देण्यात आला आहे. यासोबतच कोकणासह मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात सुद्धा पावसाने धुमशान घातले आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागांत रस्त्यांवरून पाण्याचे लोंढे वाहत होते. तर पुण्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली.
शनिवारपासून जोर कमी होणार
पावसाचा जोर आणखी दोन दिवस राहील. उत्तर महाराष्ट्र, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर अशा दहा जिल्ह्यांत शनिवारपासून (२८ सप्टेंबर) पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता आहे, अशी माहिती निवृत्त हवामान शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.