पीएमपीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास चालकांना १२०० रुपये दंड!

पुणे: पीएमपीच्या चालक आणि वाहकांबद्दलच्या तक्रारीचे प्रमाण वाढले आहे. बस चालविताना नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होत असल्याचे पीएमपी प्रशासनाच्या लक्षात आले असून, आता नियम मोडणाऱ्या चालक आणि वाहकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास चालकांना १२०० रुपये दंड भरावा लागणार असून, निलंबनाची कारवाई होण्याची ही शक्यता आहे.
पीएमपीकडून पुणे आणि पिंपरी-चिंचवड भागात पीएमआरडीए कार्यक्षेत्रापर्यंत बससेवा पुरविली जात आहे. त्यामध्ये पीएमपी आणि ठेकेदारांच्या बसवरील चालक वाहतुकीच्या नियमांचे पालन करीत नसल्याबाबत प्रशासनाला वारंवार तक्रारी व सूचना प्राप्त होत आहे. या तक्रारीमध्ये प्रामुख्याने बस चालविताना मोबाईलवर बोलणे, झेब्रा क्रॉसिंगवर बस थांबविणे, धूम्रपान करणे, मार्ग बोर्ड न बदलणे, लेनच्या शिस्तीचे पालन न करणे, सिग्नल तोडणे या तक्रारींचा समावेश आहे.