ट्रॅव्हलर आग प्रकरणी चालकावर खुनाचा गुन्हा!

हिंजवडी : हिंजवडी येथे ट्रॅव्हलर बसला आग लागल्याने चार कामगारांचा मृत्यू झाला. तर पाच कामगार जखमी झाले. या प्रकरणाचा उलगडा करण्यात हिंजवडी पोलिसांना यश आले आहे. ट्रॅव्हलर बस चालकानेच कट रचून कामगारांना ठार मारल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे चालकावर खुनाचा आणि खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जनार्दन निळकंठ हुंबर्डीकर (वय ५४, रा. वारजे, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी चालकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक दत्ता काळे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जनार्दन याचे इतर कामगारांसोबत सतत भांडण होत होते. त्याचा राग त्याच्या मनात होता. तसेच त्याला चालकाच्या कामाव्यतिरिक्त अन्य कामे दिली होती. त्याचाही राग त्याच्या मनात होता. त्यामुळे त्याने कामगारांना धडा शिकवण्याचे ठरवले. कंपनीतील बेन्झीन केमिकल कापडावर टाकून त्याला आग लावून ते बसमध्ये टाकले. त्यामुळे बसमधील चार कामगार ठार झाले. तर पाच कामगार जखमी झाले. चालक जनार्दन देखील जखमी झाला आहे. सुरुवातीला अपघात वाटणाऱ्या या प्रकरणात पोलिसांनी तपास करीत हा घातपात असल्याचे उघडकीस आणले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.
सांगवी मध्ये १०.१३८ किलो गांजा जप्त
सांगवी :सांगवी मधील पिंपळे सौदागर येथे गांजा विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. तरुणाकडून १०.१३८ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. २०) दुपारी करण्यात आली.
हरीश मगन सोनावणे (वय २७, रा. पिंपरी गाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह रोहिदास पावरा याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस अंमलदार विजय दौंडकर यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे सौदागर येथील पाण्याच्या टाकीजवळ एक तरुण दुचाकीवरून गांजा विक्रीसाठी आला असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून हरीश याला ताब्यात घेतले. त्याच्या दुचाकीची तपासणी केली असता त्यामध्ये १०.१३८ किलो गांजा आढळून आला. पोलिसांनी गांजा सह दोन मोबाईल फोन, एक दुचाकी असा एकूण पाच लाख ८८ हजार ९०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.
कंपनीच्या जागेत बेकायदेशीरपणे अतिक्रमण
वाकड : दहा ते बारा जणांच्या टोळक्याने ग्लोरिया सॉफ्टवेअर पार्क या कंपनीच्या जागेत बेकायदेशीरपणे अतिक्रमण करून कामगारांना मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. २०) दुपारी वाकड येथे घडली.
किशोर वसंत साळवी, बबलू वाघमारे, शैलेश वाघमारे, रुपेश वाघमारे, कुणाल वाघमारे, दिलीप वाघमारे, एक महिला आणि इतर चार ते पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अमित महेंद्र सोनावणे (वय ३४, रा. वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी काम करत असलेल्या ग्लोरिया सॉफ्टवेअर कंपनीच्या जागेत बेकायदेशीरपणे प्रवेश केला. त्यानंतर फिर्यादी आणि इतर कामगारांना मारहाण केली. जागेला केलेल्या कंपाउंडची आरोपींनी तोडफोड केली. पाण्याचे कॅन आणि इतर वस्तूंची नासधूस केली असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.