डॉ. बाबा कांबळे यांच्या भूमिकेमुळे संपाची ‘हवा’ निघाली;रिक्षा-टॅक्सी सेवा सुरळीत!

ई-चलन पद्धत रद्द करण्याच्या मागणीवर ठाम; जॉइंट ॲक्शन कमिटीसोबत बाबा शिंदे व बाबा कांबळे एकत्र लढणार!
पुणे : पुणे शहर वाहतूक पोलिसांच्या ई-चलन आणि परवाना रद्द करण्याच्या जाचक निर्णयाविरोधात आज पुकारण्यात आलेल्या संपाचा कोणताही परिणाम जनजीवनावर झाला नाही.

महाराष्ट्र रिक्षा पंचायत आणि ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन ऑफ इंडिया या प्रमुख संघटनांनी या संपात सहभागी न होण्याचा निर्णय घेतल्यामुळे संपाची ‘हवा’ निघून गेली असून, शहरातील सर्व रिक्षा, टॅक्सी आणि व्यावसायिक वाहने सुरळीत सुरू आहेत, असा दावा राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांनी केला आहे.
या संदर्भात प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात डॉ. बाबा कांबळे यांचे खालील महत्त्वाचे मुद्दे
१. काही बोगस संघटनांनी वैयक्तिक स्टंटबाजीसाठी हा संप पुकारला होता. ऑटो टॅक्सी व कॅब कष्टकरी रिक्षाचालकांना विश्वासात न घेता आणि केवळ गोंधळ निर्माण करण्यासाठी केलेल्या या आवाहनाला चालकांनी नाकारले आहे. डॉ. बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखालील संघटनांनी पाठिंबा न दिल्याने आज पिंपरी चिंचवड पुण्यात वाहतूक व्यवस्था पूर्णपणे सुरळीत राहिली.
२. मागण्या रास्तच; पण पद्धत चुकीची
डॉ. बाबा कांबळे यांनी स्पष्ट केले की, “ई-चलन प्रणालीतील त्रुटी आणि ३० दिवसांत परवाना रद्द करण्याची पोलिसांची नोटीस पूर्णपणे बेकायदेशीर आहे. ही पद्धत रद्द झालीच पाहिजे, या मागणीवर आम्ही आजही ठाम आहोत. मात्र, चुकीच्या लोकांच्या नेतृत्वाखालील आंदोलनात सहभागी होऊन चालकांचे नुकसान करणे आम्हाला मान्य नव्हते.”
३. बाबा शिंदे आणि बाबा कांबळे आता एकत्र
या आंदोलनादरम्यान एक महत्त्वाची घडामोड घडली आहे. ट्रान्सपोर्ट विभागाचे नेते बाबा शिंदे यांच्याशी डॉ. बाबा कांबळे यांची सविस्तर चर्चा झाली असून, उभय नेत्यांमधील सर्व गैरसमज आता दूर झाले आहेत. येणाऱ्या काळात कष्टकऱ्यांच्या प्रश्नांवर ‘जॉइंट ॲक्शन कमिटी’च्या माध्यमातून बाबा शिंदे आणि डॉ. बाबा कांबळे एकत्र येऊन लढा देणार आहेत, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
४. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अपेक्षा
“आम्ही मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सविस्तर निवेदन दिले असून त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री या प्रश्नात नक्कीच सकारात्मक हस्तक्षेप करतील आणि ई-चलन प्रक्रियेतील जाचक अटी सुधारतील, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे,” असे डॉ. बाबा कांबळे यांनी नमूद केले.
५. बोगस संघटनांना चपराक
ज्या संघटनांनी चालकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला, त्यांना आजच्या अयशस्वी संपामुळे मोठी चपराक बसली आहे. रिक्षा-टॅक्सी चालकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता आपल्या हक्काच्या ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन ऑफ इंडिया व’महाराष्ट्र रिक्षा पंचायत’च्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

