जुन्या भांडणाच्या कारणावरून डिलिव्हरी बॉयवर कोयत्याचा वार;चार जणांना अटक

पिंपरी : जुन्या भांडणाच्या कारणावरून डिलिव्हरी बॉयवर कोयत्याचा वार करण्याचा प्रयत्न करून स्विफ्ट कार मध्ये जबरदस्तीने बसवून कार मध्ये कोयत्याने डोक्यावर वार करून गंभीर जखमी केले. ही घटना मंगळवार 10 फेब्रुवारी रोजी दुपारी पावणेतीनच्या सुमारास केशवनगर मराठी शाळेसमोर काळेवाडी रोड चिंचवड येथे घडली .याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत आशितोष संतोष वराडे (वय 22, डिलिव्हरी बॉय, वराडे चाळ, गावडे भोईर अळी, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. विकी अनिल घोलप (वय 31, सध्या रा. शिरगाव परंदवडी, मावळ), मयूर अनिल घोलप (वय 33, सध्या रा. शिरगाव, परंदवडी, ता. मावळ), शुभम विनायक चौधरी (वय 29, रा. गावडे भोईरआळी, चिंचवड), आदित्य अशोक चव्हाण (वय 29, रा. भिम नगर, चिंचवड ), मंगेश नंदकुमार सांगळे (वय 27, रा. काकडे पार्क, चिंचवड), प्रसाद उर्फ सोन्या मारुती साबळे (वय 23, रा. मोरे वस्ती ,चिखली), समीर कोंडीराम भोईर (रा. चिंचवड) अशी अशी आरोपींची नावे आहेत .यापैकी आरोपी क्रमांक तीन, पाच, सहा आणि सात यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी केशवनगर मराठी शाळेसमोरून जात असताना आरोपी क्रमांक एक व तीन यांनी त्यांच्या हातातील कोयता दहशत पसरवण्याच्या उद्देशाने हवेत फिरवून जुन्या भांडणाच्या कारणावरून फिर्यादीवर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर फिर्यादीला आरोपी क्रमांक दोन व चार यांनी स्विफ्ट कार मध्ये जबरदस्तीने बसवून स्विफ्ट कार मध्ये जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने आरोपी क्रमांक एक याने फिर्यादीच्या डोक्यावर कोयत्याने व आरोपी क्रमांक चार याने त्याच्या हातातील लोखंडी कड्याने फिर्यादीच्या डोळ्यावर वार केले .त्यानंतर त्यांनी फिर्यादीला गावडे जलतरण तलाव चिंचवडगाव येथे नेऊन आरोपी एक ते सात यांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चासकर पुढील तपास करत आहेत.

