फक्त मुद्द्याचं!

1st December 2025
पुणे

हिंजवडी, वाघोली, शिक्रापूर येथील वाहतूककोंडी रोखण्यासाठी निर्णायक पाऊल!

हिंजवडी, वाघोली, शिक्रापूर येथील वाहतूककोंडी रोखण्यासाठी निर्णायक पाऊल!

 पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)
पुणे : हिंजवडी, वाघोली, शिक्रापूर येथील वाहतूककोंडी रोखण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)कडून निर्णायक पाऊल उचलण्यात आले असून, या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या सूचनांनुसार, पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी आज (दि.26) आकुर्डी येथील मुख्यालयात विभाग प्रमुखांसह महसूल, पोलिस,एमआयडीसी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासह सर्व विभागांची आढावा बैठक घेतली.

viara vcc
viara vcc

या बैठकीला हिंजवडी, वाघोली येथील नागरिकांनीदेखील उपस्थित राहून सूचना मांडल्या. बैठकीत प्रामुख्याने, 5 डिसेंबरपूर्वी खड्डेविरहित रस्ते करण्याच्या सूचना डॉ. म्हसे यांनी दिल्या असून, हिंजवडी येथील प्रस्तावित रस्ते तसेच अस्तित्वातील रस्त्यांच्या भूसंपादनाबाबत आढावा घेण्यात आला.आकुर्डी येथील मुख्यालयात आज (दि.26) आढावा बैठक पार पडली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या क्षेत्रातील अनुक्रमे हिंजवडी येथील नवीन रस्ते अनुषंगिक भूसंपादन, हिंजवडी येथील मेट्रो लाईन, रामवाडी मेट्रो स्थानक, हिंजवडी येथील वाहतूक समस्या, तसेच परिसरातील अवजड वाहतुकीसाठी नियमावली तयार करणे, बालेवाडी व बाणेर येथे अंडरपास तयार करणे, हिंजवडीला जोडणारे सेवा रस्ते व अंडरपास तयार करणे, हिंजवडी फेज 1, 2 व 3 येथे पावसाळी पाण्याच्या निचऱ्याच्या अनुषंगाने नियोजन, तसेच सदर ठिकाणी मैला शुद्धिकरण प्रकल्प उभारणे, राष्ट्रीय महामार्गावर चांदणी चौकामध्ये विकसित करण्यात आलेल्या फ्री-वे प्रमाणे हिंजवडी येथे विकसन करणे, तसेच हिंजवडी येथे घनकचरा व्यवस्थापन तसेच शासकीय हॉस्पिटलची उभारणी, याबाबत दि. 10 जुलै 2025 रोजी मुंबई येथे बैठक घेतली होती. या बैठकीतील निर्देशाप्रमाणे आढावा घेण्यासाठी पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या अध्यक्षतेखाली आकुर्डी येथील मुख्यालयात आज (दि.26) आढावा बैठक पार पडली.

या बैठकीला पीएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला, पोलिस उपायुक्त (वाहतूक) सारंग आव्हाड, मावळ-मुळशीचे प्रांताधिकारी सुरेंद्र नवले, जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन समन्वयन अधिकारी कल्याण पांढरे, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सह-शहर अभियंता बापू गायकवाड, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी)चे कार्यकारी अभियंता राजेंद्र तोतला, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी)च्या प्रादेशिक अधिकारी श्रीमती अर्चना पाठारे, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (MSETCL)चे अतिरिक्त कार्यकारी अभियंता तुषार दहागावकर, वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस आय़ुक्त सतीश नांदूरकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव यांच्यासह पीएमआरडीएचे संचालक अविनाश पाटील, सहसंचालक श्रीमती श्वेता पाटील, मुख्य अभियंता शिवप्रसाद बागडी तसेच शिवाजीनगर हिंजवडी मेट्रो लाईन-3चे सवलतकार कंपनीचे प्रतिनिधी अनिलकुमार सैनी, महामेट्रोचे राजेश जैन आदी उपस्थित होते.

या बैठकीत हिंजवडी येथील नवीन प्रस्तावित रस्ते तसेच अस्तित्वातील रस्त्यांच्या भूसंपादनाबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी प्रांताधिकारी सुरेंद्र नवले यांनी पीएमआरडीएकडून आजपर्यंत 18 प्रस्ताव दाखल झालेले असून, त्यापैकी तीन रस्त्यांची मोजणी पूर्ण झालेली असल्याचे सांगितले. इतर उर्वरित आखणींबाबत उर्वरित काम तातडीने पूर्ण करण्याबाबत सूचना दिल्या. बैठकीत एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता तसेच प्रादेशिक अधिकारी यांना तातडीने हिंजवडी – पिरंगुट – घोटावडे राज्यमार्ग – 130 मधील हिंजवडी फेज- 1 (विप्रो सर्कल फेज – 1) ते हिंजवडी फेज- 3 (माण) दरम्यानचा रस्ता व त्यावरील एलिव्हेटेड कॉरिडोरसाठी एमआयडीसीमार्फत भूसंपादन प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याचे निर्देश दिलेत.

हिंजवडी एमआयडीसीच्या अधिकार्‍यांनी नाल्यांचे सर्वेक्षण सल्लागार मे. टंडन अर्बन सोल्यूशन्स यांनी पूर्ण केले असल्याचे सांगीतले. सदरचा अहवाल प्राधिकरण कार्यालयास पुढील दोन दिवसात सादर करण्यात येत आहे.

वाघोली ते शिक्रापूर रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करायच्या दृष्टीने पुणे – अहिल्यानगर मार्गास समांतर 30 मीटर रस्ते नियोजन (आरपी) नकाशानुसार खराडी जकात नाका ते केसनंद ते बकोरी रस्ता हा वाघोली बायपास रस्ता असून, रस्त्याचे सीमांकनाचे काम पीएमआरडीएकडून पूर्ण केले आहे. पुणे महानगरपालिकेमार्फत रस्ता विकसित करण्याचे प्रस्तावित आहे.

वाघोली व केसनंद परिसरातील वाहतूक कोंडी कमी करून खराडीपासून केसनंद चौक बायपास करून पुणे – अहिल्यानगर मार्गावरील लोणीकंदपर्यंतच्या नवीन वाघोली,केसनंद बायपास रस्त्याच्या नवीन मार्गाबाबत प्रत्यक्ष पाहणी करून प्रस्तावित करण्यात यावा, जेणेकरून वाघोली व केसनंद या परिसराला नवीन बायपास रस्ता उपलब्ध होईल, असेही महानगर आयुक्तांनी निर्देशित केले.

पीएमआरडीएमार्फत वाघोली अर्बन ग्रोथ सेंटर (UGC) अंतर्गत पीएमआरडीएच्या क्षेत्रातील सुरभी हॉटेल ते भावडी ,लोहगाव रस्ता, तुळापूर – भावडी – वाघेश्वर मंदिर रस्ता व आव्हाळवाडी ते मांजरी खुर्द रस्ता भूसंपादन करून विकसित करण्याबाबत कार्यवाही सूरु आहे. या मुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. शिक्रापूर चौकातील वाहतूक कोंडी कमी करण्याचे दृष्टीने पीएमआरडीएकडून प्रस्तावित प्रादेशिक योजनेतील प्र.रा.मा. ५ – सणसवाडी ते रा.मा.55- पिंपळे जगताप जोडणारा प्रमुख मार्ग (इसपत) रस्ता करणे, तळेगाव ढमढेरे -मझाक इंडिया कंपनी – एल अॅण्ड टी फाटा – पिंपळे जगताप ते करंदी फाटा रस्ता करणे, सणसवाडी ते तळेगाव ढमढेरे रस्ता करणे, कोंढापूरी ते तळेगाव ढमढेरे रस्ता करणे, कासारी फाटा – वाबळेवाडी जातेगाव ते राज्यमार्ग ५४८-ड रस्ता करणे, शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे ते धायकर वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वेळ नदीवरील पूल व पुलाच्या दोन्ही बाजूच्या पोहोच रस्त्याचे बांधकाम करणे, आदीबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली. ही कामे मंजूर असून, भूसंपादनासह विकसित करण्याचे नियोजन आहे. यामुळे भविष्यातील शिक्रापूर चौकातील वाहतूक कोंडीकमी होण्यास मदत होणार असल्याचे पीएमआरडीएच्या मुख्य अभियंत्यांनी या बैठकीत स्पष्ट केले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"