मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या १७ व्या सोहळ्यात येत्या ८ ऑक्टोबर रोजी अभिनेते मिथुन चक्रवर्तींना सन्मानित करण्यात येणार आहे.
मिथुन चक्रवर्ती यांनी मृगया, डिस्को डान्सर, अग्निपथ, गुरु यांसारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटांमधून साकारलेल्या विविध भूमिका प्रेक्षकांच्या आजही स्मरणात आहेत. अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना मिथुनदा असंही संबोधण्यात येतं. आत्तापर्यंत मिथुन चक्रवर्ती यांनी शेकडो चित्रपटांमध्ये काम केलं आहे. विविध पुरस्कारही त्यांना मिळाले आहेत. आता चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मान दादासाहेब फाळके पुरस्कार या पुरस्काराने मिथुन चक्रवर्ती यांना गौरवण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांच्या सोशल मीडियावर ही घोषणा जारी केली आहे. अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांच्या भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल हा पुरस्कार त्यांना देण्यात येणार असल्याचं दादासाहेब फाळके पुरस्कार निवड समितीने सांगितले आहे.
रामकृष्ण परमहंस यांची भूमिका साकारली
मिथुन चक्रवर्तींनी ‘स्वामी विवेकानंद’ या १९९८ मध्ये आलेल्या चित्रपटात रामकृष्ण परमहंस ही भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. तसंच आत्तापर्यंत त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मणिरत्नम दिग्दर्शित गुरु या चित्रपटात त्यांनी साकरलेलं माणिकदास गुप्ता हे पात्र रामनाथ गोयंका यांच्या आयुष्यावर आधारित होतं. या भूमिकेचंही खूप कौतुक झालं. आता चित्रपटसृष्टीतील योगदानाबाबत त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे.
मृगयाने ओळख दिली
१९७६ मध्ये प्रदर्शित झालेल्या मृगया या त्यांच्या पहिल्या चित्रपटाने अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना व्यापक ओळख मिळाली . ज्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनयाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता . १९८२ मध्ये आलेल्या डिस्को डान्सर या चित्रपटाने मिथुन चक्रवर्ती यांना देशभर प्रसिद्धी मिळाली. १०० कोटी क्लबमध्ये गेलेला हा हिंदी सिनेसृष्टीतला पहिला चित्रपट आहे. मिथुन यांना आतापर्यंत तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कारही मिळालेला आहे.