मराठीची गळचेपी होऊ नये: दादाभाऊ गावडे

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी : इंग्रजी भाषेचे जगात प्रचंड स्तोम असताना मराठीची गळचेपी होऊ नये, असे मत संमेलनाध्यक्ष दादाभाऊ गावडे यांनी व्यक्त केले.
दादाभाऊ गावडे म्हणले, माय मराठीकडे पाहण्याचा दृष्टिकोन सर्वच पातळीवर बदलला पाहिजे. उपेक्षितांचे जिणे आणि सौभाग्याचे लेणे ल्यालेल्या मराठी भाषेने जगाला विश्वात्मकतेच्या धाग्यात बांधले आणि इतिहासाच्या पानापानावर पराक्रमाचा, वैभवाचा, शालिनतेसह औदार्याचा इतिहास सुवर्ण अक्षरात लिहिला. व्यापाराची, ज्ञान – विज्ञानाची, व्यवसायाची भाषा म्हणून इंग्रजी भाषेचे जगात प्रचंड स्तोम असताना मराठीची गळचेपी होऊ नये. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आपल्या सर्वांची जबाबदारी वाढली आहे. माय मराठीचा गोडवा साता समुद्रापार पोहोचावा आणि तनामनात तिचा जागर होऊन अतिउच्च शिखरावर ती विराजमान व्हावी!” असे प्रतिपादन केले.

डॉ. शिवाजीराव मोहिते यांनी, “साहित्य संमेलनातून जाणीवपूर्वक मराठी शब्दांना प्राधान्य द्यावे; तसेच संतसाहित्याचे वाचन करणे गरजेचे आहे!” अशी अपेक्षा व्यक्त केली. बाबाजी काळे यांनी, “साहित्य हे समुद्रासारखे अथांग असते. त्याच्या खोलीचे आकलन संमेलनाच्या माध्यमातून होते!” असे मत व्यक्त केले. सुनीताराजे पवार यांनी, “अखिल भारतीय संमेलनासारखे इंद्रायणी साहित्य संमेलनाचे स्वरूप आहे. हे संमेलन म्हणजे जणू काही प्रकाशाचे बेट आहे!” असे गौरवोद्गार काढले.