चिनी नागरिकांसोबत मिळून भारतात सायबर फसवणुकीचे गुन्हे!

१५० ते १६० नागरिकाची अंदाजे २० ते २५ कोटी रूपयाची फसवणूक
पिंपरी : चिनी नागरिकांसोबत मिळून भारतात सायबर फसवणुकीचे गुन्हे करत असलेल्या सहा जणांना सायबर पोलिसांनी अटक केली आहे. फसवणुकीची रक्कम घेऊन ते क्रिप्टो करन्सी आणि युएसडीटी मध्ये कन्व्हर्ट करून ती चीन मधील आरोपींना पाठवत असत. त्यांच्याकडून मिळणारे कमिशन ते हवाला, मनी ट्रान्सफर आणि इतर माध्यमातून स्वीकारले. त्यांनी आता पर्यंत १५० ते १६० नागरिकाची अंदाजे २० ते २५ कोटी रूपयाची फसवणूक केल्याचे तपासात आढळून आले आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये यश भारत पाटोळे (२५, न्यु पॅलेस, कोल्हापुर), अब्दुल माजिद शेख (३४, उंड्री, पुणे), मोहम्मद सुलतान अहमद मोहम्मद जेहरेहुन (३०, पटणा, बिहार), माझ अफसर मिर्झा (२४, स्वारगेट, पुणे), हुसेन ताहीर सोहेल शेख (२३, संभाजीनगर), बाबुराव शिवकिरण मेरु (४१, हडपसर, पुणे) यांचा समावेश आहे. अटक केलेल्यांपैकी पाचजण चिनी भाषा बोलणाऱ्या विदेशी नागरिकांच्या संपर्कात राहून भारतात सायबर फसवणूक करत होते.
फार्मा कंपनीत प्रोग्रामर म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीला फेसबुक पाहत असताना शेअर मार्केट संदर्भात एक जाहीरात दिसली. त्या जाहीरातीमध्ये शेअर मार्केट मध्ये गुंतवणुकीवर रोजचे रोज १० ते २० टक्के नफा मिळेल असे सांगितले जात होते. त्या जाहीरातीमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर फिर्यादीचे नाव व नंबर ॲड केले. त्यानंतर त्यांना वेगवेगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप मध्ये ॲड करण्यात आले.
त्यानंतर फिर्यादी यांना आरोपींनी शेअर मार्केट मध्ये गुंतवणुक करण्याचे टिप्स देऊन फिर्यादी यांनी गुंतवणुक केल्यास ८ ते २५ टक्के नफा मिळण्याचे अमिष दाखवले. लिंक पाठवून ट्रेडिंग ऍपवर ८९ लाख ३५ हजार ३०५ रुपये गुंतवणुक करण्यास सांगितले. फिर्यादीने गुंतवणूक केली असता त्यांना गुंतवलेल्या रक्कमेवर ८ कोटी ७१ लाख रुपये नफा झाल्याचे दाखवले. फिर्यादी यांनी ती रक्कम काढण्याचाप्रयत्त्न केला असता त्यांना आणखी पैशांची मागणी करण्यात आली. त्यांनी गुंतवलेली रक्कम न देता त्यांची फसवणूक करण्यात आली. याबाबत सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आरोपींनी एका बँक खात्यावर ३३ लाख ८६ हजार रुपये ट्रान्सफर करून घेतल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार पोलिसांनी बँक खात्याची माहिती घेत यश पाटोळे याची ओळख पटवली. तो पुणे शहरातील कोंढवा येथे असल्याची माहिती मिळताच पोलिसांची याला ताब्यात घेतले. त्याचे साथीदार कोंढवा येथील एका हॉटेल मध्ये बसून चिनी भाषा बोलणाऱ्या विदेशी नागरिकांशी संपर्क साधत सायबर गुन्हे करत असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार सायबर पोलिसांनी आणखी पाच जणांना अटक केली. त्यांच्याकडून नऊ मोबाईल फोन, १५ सिमकार्ड, चार सीसीटीव्ही, आठ चेक बुक, २० एटीएम कार्ड, एक लॅपटॉप, एक मेमरी कार्ड, एक पासपोर्ट आणि १३ हजार ५५० रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उप आयुक्त डॉ. शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सहायक पोलीस निरीक्षक प्रविण स्वामी, पोलीस उपनिरीक्षक वैभव पाटील, सागर पोमण, रोहीत डोळस, प्रकाश कातकाडे, विदया पाटील, पोलीस अंमलदार, हेमंत खरात, सुभाष पाटील, अभिजित उकिरडे, अतुल लोखंडे, सौरभ घाटे, प्रविण शेळकदे, सचिन घाडगे, मुकुंद वारे, दिपक भोसले, सोपान बोधवड, माधव आरोटे, सुरज शिंदे, स्वप्नील कणसे, विशाल निचीत, निलेश देशमुख, संतोष सपकाळ, ज्योती साळे, दिपाली चव्हाण, नम्रता कांबळे यांनी केली आहे.

