सायबर गुन्हेगारी ; म्युल बँक अकाउंटद्वारे फसवणुकीचा फंडा!

पिंपरी: सायबर गुन्हेगार फसवणुकीची रक्कम वेगवेगळ्या म्युल बँक अकाउंट वर वर्ग करत असल्याचे निदर्शनास आले आहे. सायबर गुन्हेगार टेलिग्राम, व्हाट्सअप, फेसबुक यासारख्या सोशल मीडिया माध्यमातून नागरिकांना परदेशातून संपर्क साधतात. नागरिकांकडून बँक अकाउंट प्राप्त करून सायबर गुन्ह्यातील फसवणुकीची रक्कम म्युल बँक अकाउंट मध्ये वर्ग करुन नागरिकांची फसवणूक केली जाते. नागरिकांनी आपली फसवणूक टाळण्यासाठी , हे गुन्हे घडू नयेत म्हणून काळजी घ्यावी असे आवाहन पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा डॉ. शिवाजी पवार यांनी केले आहे.

सायबर गुन्हेगार नागरिकांना त्यांचे बँक अकाउंट त्यांचा सिव्हिल स्कोर वाढवण्यासाठी ,गेमिंगचे पैसे प्राप्त करण्यासाठी, शेअर मार्केटचे पैसे काढण्यासाठी वापरण्यात येणार असल्याचे सांगितले जाते. बँक अकाउंटवर प्राप्त होणाऱ्या रकमेच्या दोन ते पाच टक्क्यांपर्यंत कमिशन देण्याचे आमीष दाखवून त्यांना करंट, सेविंग बँक अकाउंट काढण्यासाठी सांगितले जाते. बँक अकाउंटचे पासबुक, चेक बुक, एटीएम कार्ड व बँक अकाउंटला लिंक केलेले सिम कार्ड विशिष्ट पत्त्यावर पाठवण्यासाठी सांगितले जाते.
नागरिकांना कमिशन देण्याचे आमीष दाखवून विमानाद्वारे परराज्यात बोलावून आलिशान हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली जाते .ज्या ठिकाणी व्यवस्था केली जाते ,त्या ठिकाणी पोहोचल्यावर त्यांच्याकडून बँक अकाउंट डिटेल्स, चेक बुक, एटीएम कार्ड, ऑनलाइन बँकिंग डिटेल्स व बँक लिंक सिम कार्ड जबरदस्तीने ताब्यात घेऊन बँक अकाउंटवर अनाधिकृत ट्रांजेक्शन केले जाते .नागरिकांच्या बँक अकाउंट वर पैसे प्राप्त झाल्यानंतर ते पैसे इतर वेगवेगळ्या बँक अकाउंट वर ट्रान्सफर केले जातात किंवा त्यांचे बँक अकाउंट आहे ,त्या नागरिकांना चेक द्वारे पैसे काढून देण्यासाठी सांगितले जाते.
अशी ठाळावी सायबर फसवणूक
अशाप्रकारे नागरिकांच्या म्युल अकाउंटवर सायबर गुन्ह्यातील कोट्यावधी रुपये घेऊन नागरिकांची फसवणूक केली जाते. नागरिकांनी आपली फसवणूक टाळण्यासाठी टेलिग्राम, व्हाट्सअप, फेसबुक या सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झालेल्या अज्ञात व्यक्तींना स्वतःचे बँक अकाउंट, चेकबुक, एटीएम कार्ड, ऑनलाइन बँकिंग डिटेल्स व बँक लिंक सिम कार्ड देऊ नये. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झालेल्या अज्ञात व्यक्तीने आपणास बँक खाते संदर्भात व्यवहारासाठी परराज्यात बोलावल्यास जाऊ नये.
नागरिकांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता स्वतःचे बँक अकाउंट कितीही जवळचा मित्र किंवा नातेवाईक असला तरी ही देऊ नये. फसवणुकीबाबत www.cybrcrime.gov.in अथवा 1930 या हेल्पलाइनवर संपर्क करावा असे आव्हान सायबर पोलिसांनी केले आहे. सोशल मीडिया माध्यमातून फसवणुकीतील पैसे विविध बँक अकाउंट वर वर्ग केले जातात

