प्रबोधन पर्वाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांना रसिकांची दाद!

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिका आयोजित क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन पर्वाचा पाचवा दिवस विविध सांस्कृतिक व प्रेरणादायी कार्यक्रमांनी सजला होता. स्थानिक कलावंतांच्या सुमधुर गीतगायनाने दिवसाची सुरुवात झाली. त्यांनी पारंपरिक व क्रांतिकारी गीतांनी रसिक श्रोत्यांचे मन जिंकले. यावेळी महामानवांचे तेजस्वी आणि प्रेरणादायी विचार गीतांच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडण्यात आले.
यानंतर सानिका संजय जाधव यांचा एकपात्री नाट्यप्रयोग ‘मी रमाई बोलते’ सादर झाला. त्यागमुर्ती माता रमाई यांच्या दृष्टिकोनातून मांडलेले हे नाट्य सादरीकरण प्रेक्षकांना भावनिक करून गेले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षात रमाईंची साथ व त्यांची भूमिका या नाट्यप्रयोगातून प्रभावीपणे अधोरेखित झाली.

दुपारच्या सत्रात स्थानिक कलाकारांनी सामाजिक संदेश देणाऱ्या गीतांची मैफल रंगवली. यानंतर आयोजित करण्यात आलेल्या ‘भीमबुद्ध गीतांची गोड वाणी’ या कार्यक्रमाने वातावरण मंत्रमुग्ध केले. मोहम्मद रफी शेख, सुमेध कल्हाळीकर, निशांत गायकवाड, अनिरुद्ध सूर्यवंशी आणि अमिर शेख या गायकांनी आपल्या दमदार आवाजाने प्रेक्षकांची वाहवा मिळवली.
यानंतर संकल्प गोळे, अनिल गायकवाड, विशाल ओव्हाळ आणि मुन्ना भालेराव या कलाकारांच्या भीमगीतांच्या सादरीकरणाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून टाकले. यावेळी त्यांनी विविध गाजलेली भीमगीते सादर करून प्रेक्षकांना ठेका धरण्यास भाग पाडले.