अमित शाह यांनी माफी मागावी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील टिप्पणीवरून काँग्रेस आक्रमक
फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या टिप्पणीवरून वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसने या टिप्पणीवर आक्षेप घेतला आहे आणि अमित शाह यांनी माफी मागावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे. भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी किती राग आहे, हे अमित शाह यांच्या विधानावरून कळून येते, अशी टीका काँग्रेसने केली.
राज्यसभेत भाषण करताना अमित शाह म्हणाले की, “आजकाल आंबेडकरांचे नाव सारखे सारखे घेणे ही फॅशन झाली आहे. आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर असा जप काही लोक करत असतात. एवढ्या वेळा जर देवाचे नाव घेतले तर एखाद्याला स्वर्गात जागा मिळेल.” या विधानाआधी अमित शाह म्हणाले होते की, आंबेडकरांचे नाव तुम्ही १०० वेळा जरी घेतले, तरी तुम्हाला आंबेडकरांविषयी काय वाटते, हे मी सांगतो.
अमित शाह यांच्या टिप्पणीनंतर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक्सवर पोस्ट टाकून या विधानाचा निषेध केला आहे. “ज्यांना मनुस्मृतीवर विश्वास आहे, त्यांना आंबेडकरांची अडचण असते”, अशी पोस्ट राहुल गांधी यांनी केली.
काँग्रेसचे खासदार जयराम रमेश यांनीही अमित शाह यांच्या भाषणावर जोरदार टीका केली. भाजपा आणि संघाच्या मनात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी किती घृणा आहे, हे अमित शाह यांच्या विधानातून दिसून येते. आंबेडकरांच्या नावाचीही त्यांना अडचण वाटते. हे तेच लोक आहेत, ज्यांचे पूर्वज आंबेडकरांचे पुतळे जाळत आहेत. जनतेने यांना धडा शिकवल्यानंतर आता त्यांना बाबासाहेब आठवत आहेत.