चाकण एमआयडीसी कर्मचारी आणि नागरिकांचा पीएमआरडी कार्यालयावर धडक मोर्चा!

पोलिसांशी खासदार अमोल कोल्हे यांची बाचाबाची
पुणे : चाकण येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या विरोधात चाकणकर ग्रामस्थ रस्त्यावर उतरले आज पीएमआरडीच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढुन आंदोलन केले. यावेळी खासदार अमोल कोल्हे ,माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हेही उपस्थित होते .या निषेध मोर्चामध्ये चाकण एमआयडीसी मधील कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर सामील झाले होते.

हिंजवडी आयटी पार्क, हडपसर ,खराडी या रस्त्यांप्रमाणेच पुणे नाशिक रस्त्यावरील चाकण येथे दररोज वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीत तीन ते चार तास बसून राहावे लागते, याची दखल सरकार घेत नाही. पालकमंत्री अजित पवार यांनी पाहणी दौरा केला .अतिक्रमणे काढली परंतु पुढे काहीच नाही असा दावा ग्रामस्थ करत आहेत. अतिक्रमणे काढल्याने वाहतूक कोंडी सुरळीत होती का असा प्रश्न कर्मचारी उपस्थित करत होते. चाकण मधील वाहतूक कोंडीमुळे एमआयडीसी मधील अनेक उद्योग या भागातून स्थलांतरित होण्याच्या मार्गावर आहेत ,त्यामुळे येथील नागरिकांचा रोजगार जाण्याची भीती निर्माण झाल्याचा दावा केला जात आहे. ज्यावेळी व्हीआयपी मंडळी, राजकारणी या रस्त्यावरून जातात त्यावेळी त्यांना रस्ता मोकळा करून दिला जातो. अन्यवेळी पोलीस कुठे जातात असा प्रश्न कर्मचाऱ्यांनी विचारला.
पी एम आर डी ए कार्यालयाबाहेर आंदोलकांची मोठी गर्दी झाली होती .खासदार अमोल कोल्हे यांनी पीएमआरडीच्या कार्यालय आवारात या आंदोलनकर्त्यांना बसवण्याची परवानगी मागितली. मात्र पोलिसांनी ती नाकारली यावरून खासदार कोल्हे आणि पोलीस अधिकारी यांच्यात बाचाबाची झाल्याचे दिसून आले नागरिकांनी कार्यालया पर्यंत शांततेत मोर्चे आणला आहे. आम्हाला कार्यालयातील परिसरात जाऊ द्या कुठल्या नियमाने आम्हाला अडवले जाते असे म्हणत खासदार कोल्हे यांनी पोलिसांसमोर आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले. आम्हाला आत जाऊ द्या ,अन्यथा प्रशासनाला खाली बोलवा अशी भूमिका त्यांनी घेतली .आक्रमक भूमिका घेतल्याने पोलिसांनी शिष्टमंडळाला पीएमआरडीच्या कार्यालयात जाण्यास परवानगी दिली .

