फक्त मुद्द्याचं!

5th February 2026
कला साहित्य

बालनाट्य व लोककलेतून मराठी संस्कृतीचा उत्सव!

बालनाट्य व लोककलेतून मराठी संस्कृतीचा उत्सव!

अभिजात मराठी भाषा सप्ताहात बालरंगभूमीपासून लोकसंस्कृतीचा प्रवास उलगडतोय
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिका आयोजित तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखा आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखा यांच्या सहकार्याने तसेच श्री भैरवनाथ सार्वजनिक ग्रंथालय, भोसरी आणि हुतात्मा चापेकर सार्वजनिक ग्रंथालय, चिंचवड यांच्या सहभागातून साजरा होत असलेला ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ सध्या उत्साहात साजरा होत आहे. यानिमित्त पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृहात महापालिकेच्या विद्यार्थ्यांसाठी ‘राजा सिंह’ हे बालनाट्य तर नागरिकांसाठी ‘महाराष्ट्राचा मराठी बाणा’ हा कार्यक्रम सादर करण्यात आला.

viara vcc
viara vcc

यामध्ये चर्चा सत्रे, मराठी नाटके, एकांकिका, बालनाट्य, कवी संमेलन, साहित्यिक चर्चा, कथा वाचन, अभंगवाणी, भजन स्पर्धा, सुलेखन स्पर्धा, पसायदान स्पर्धा अशा मराठी भाषेला समृद्ध करणाऱ्या कार्यक्रमांचा समावेश आहे. त्याच अनुषंगाने पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृहात विविध कार्यक्रम पार पडले.

‘राजा सिंह’ नाट्याच्या कथानकातील सिंहाच्या व्यक्तिरेखेतून धैर्य, प्रामाणिकपणा, संकटांवर मात करण्याची ताकद तसेच एकतेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. मनोरंजक प्रसंग, रंगीत वेशभूषा, नृत्य आणि गीतांनी नाटकाला बालरसिकांच्या मनात वेगळे स्थान मिळवून दिले. विद्यार्थ्यांनी प्रयोगातील संवाद आणि प्रसंगांना टाळ्यांची दाद दिली.

महापालिकेच्या वतीने अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन नियमितपणे होत असल्याने मुलांमध्ये मराठी भाषेची गोडी वाढत असून पुढील पिढी भाषेच्या समृद्धीसाठी नक्कीच योगदान देईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. हा कार्यक्रम विद्यार्थीदशेतील मुलांवर मराठी भाषेचे संस्कार करणारा आणि त्यांना मराठी लोकनाट्याची प्रचिती घडवून देणारा ठरला.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"