फक्त मुद्द्याचं!

1st December 2025
पुणे

बीआरटीएस सेवेमुळे प्रवाशांचा प्रवास होतोय सुखकर?

बीआरटीएस सेवेमुळे प्रवाशांचा प्रवास होतोय सुखकर?

पिंपरी चिंचवड शहरातील पाच मुख्य कॉरिडॉरमध्ये दररोज ७ हजार ३८९ बसफेऱ्या सुरू असल्याचा दावा?

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरामध्ये बस रॅपिड ट्रान्झिट सिस्टम अर्थात बीआरटीएस ही उच्च क्षमतेची आणि चांगली वारंवारिता असणारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणून समोर येत आहे. या अंतर्गत शहरातील पाच मुख्य कॉरिडॉरमध्ये दररोज ७ हजार ३८९ बसफेऱ्या सुरू असून सुमारे ३ लाख ६० हजार प्रवासी प्रवास करीत आहेत. जलद आणि कार्यक्षम वाहतुकीसाठी खास डिझाइन करण्यात आलेल्या या वाहतूक व्यवस्थेमुळे सर्वात वेगवान बस सेवा मिळत असून गर्दीच्या वेळी काही मार्गांवर दर दीड ते दोन मिनिटांनी एक बस धावत आहे.

viarasmall
viarasmall

पुणे शहरात बीआरटीएसचा बट्ट्याबोळ : – बीआरटीएस वाहतूक व्यवस्थेचा कणा म्हणून निगडी–दापोडी कॉरिडॉर ओळखला जातोय. या मार्गावर दररोज सुमारे १ लाख ५० हजारांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. हा मार्ग पिंपरी चिंचवड महापालिका मुख्य प्रशासकीय इमारत, शिवाजीनगर, पुणे स्टेशन,स्वारगेट, हडपसर आणि कात्रज यांसारख्या प्रमुख ठिकाणांना जोडतोय. या मार्गावर सकाळी सहा ते आठ या दोन तासांच्या काळातच प्रत्येक तासाला किमान दोन ते तीन हजार प्रवासी प्रवास करतात.तसेच दिघी – आळंदी आणि सांगवी – किवळे या दोन्ही मार्गांवर देखील गर्दीच्या वेळेस दर दोन ते अडीच मिनिटांनी एक बस धावते. तर, काळेवाडी–चिखली आणि नाशिक फाटा–वाकड या मार्गावर सध्या इतर र्गांच्या तुलनेत कमी प्रवासी प्रवास करीत असले तरी येथेही दर पाच ते सहा मिनिटांनी एक बस धावते. या सेवेला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचेही आयटीडीपी इंडिया संस्थेच्या सर्वेक्षणात समोर आले आहे.

बस खरेदीसाठी महापालिकांचा खटाटोप :- बीआरटीएस बस सरासरी प्रति तास ३० किलोमीटर प्रति तास इतक्या वेगाने धावते. हा वेग सामान्य वाहतुकीच्या तुलनेत दुप्पट आहे. या बसमध्ये प्रवास करताना दहा किमी अंतरासाठी फक्त वीस मिनिटे लागतात, जे सामान्य वाहतूक मार्गावर ५० मिनिटे लागतात. बसने प्रवास करताना बस प्रवाशांचा वेळ वाचत असल्यामुळेच ही सेवा लोकप्रिय ठरत आहे. ही सेवा अधिक गतीशील करण्यासाठी स्वतंत्रमार्गांशिवाय पीएमपीएमएलला अजून सुमारे २ हजार ७०० बसेसची कमतरता भासत आहे. त्यासाठी पुणे, पिंपरी चिंचवड मनपा पुणे महानगर विकास प्राधिकरण व बस सेवा देणारं महामंडळ हे प्रयत्नशील आहेत.

शहरी वाहतूक व्यवस्थेवरील ताण वाढत असताना पिंपरी चिंचवड महापालिकेने बीआरटीएसमध्ये योग्य वेळी केलेल्या गुंतवणुकीमुळे प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासात आमूलाग्र बदल घडला आहे. गर्दीच्या वेळी दर ९० सेकंदांनी एक बस आणि विश्वासार्ह प्रवास, ही व्यवस्था फक्त वाहतूककोंडी कमी करत नाही, तर शाश्वत आणि नागरिक-केंद्रित वाहतूक पद्धतीची पायाभरणी करत आहे. – शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महापालिका

बीआरटीएसचे नियोजन भविष्यातील वाढत्या वाहतुकीचा अंदाज घेऊन करण्यात आले आहे. भविष्यात सक्षम वाहतूक व्यवस्था उभारण्याच्या दृष्टिकोनातून हे महत्त्वाचे पाऊल आहे. बीआरटीएस मार्गावरील बससेवेची वारंवारता वाढवण्यासाठी या मार्गावरील बस फेऱ्यांची संख्या पीएमपीएमएलच्या सहकार्यानेआणखी वाढवता येतील का, यादृष्टिनेही प्रयत्न सुरू असून त्याचे नियोजन करण्यात येत आहे. – बापू गायकवाड, सह शहर अभियंता, पिंपरी चिंचवड महापालिका

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"