सोहम् सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने सरदार पटेल जयंतीनिमित्त ग्रंथप्रदर्शन संपन्न!

पिंपरी : भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त सोहम् सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने संत तुकारामनगर, पिंपरी येथे दिवाळी अंक आणि अन्य ग्रंथांचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. परमपूज्य स्वामी स्वरूप आनंद यांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन आणि ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी लेखक – निवेदक श्रीकांत चौगुले, माणिक महाले, सुप्रिया डोळे, शुभांगी पाटील, स्मिता व्यवहारे, दिलीप ससाने, नीलेश महाले, निर्मला नेरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. सोहम् सार्वजनिक ग्रंथालय आणि अभ्यासिकेचे अध्यक्ष जगन्नाथ नेरकर यांनी प्रास्ताविक केले. स्वामी स्वरूप स्वानंद यांनी आपली ग्रंथसंपदा ग्रंथालयाला सप्रेम भेट देऊन स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपल्या कॉलेज जीवनाच्या आठवणी सांगत, ‘प्रशासकीय सेवा ही लोकसेवा आहे हे प्रथम लक्षात ठेवा. परिश्रम, जिद्द, बुद्धिमत्ता ही त्रिसूत्री महत्त्वाची आहे.
एमपीएससी, यूपीएससी या परीक्षांसाठी नुसता पुस्तकी अभ्यास पुरेसा नाही; तर आजूबाजूचे निरीक्षण तेवढेच महत्त्वाचे आहे, हेही लक्षात ठेवावे!’ असे प्रतिपादन केले. श्रीकांत चौगुले यांनीही भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी राष्ट्राच्या एकात्मतेसाठी दिलेल्या अमूल्य योगदानाची माहिती देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. प्रदीप बोरसे यांनी सूत्रसंचालन केले. ग्रंथपाल वर्षा बोरसे यांनी आभार मानले.

