फक्त मुद्द्याचं!

19th April 2025
महाराष्ट्र

मुंबई बोट अपघातातील मृतांचा आकडा १३

मुंबई बोट अपघातातील मृतांचा आकडा १३

गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे निघालेल्या बोटीला नौदलाच्या स्पीड बोटची धडक

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : गेट वे ऑफ इंडियाजवळ एलिफंटाच्या दिशेने जाणाऱ्या नीलकमल बोट दुर्घटनेतील मृतांचा आकडा आता १३ वर पोहोचला आहे. या अपघाताची तीव्रता इतकी गंभीर आहे की, हा आकडा आणखी वाढण्याची भीती वर्तविली जात आहे.

स्पीड बोटची धडक लागून एलिफंटा लेण्यांकडे जाणारी फेरी बोट आज बुडाली. एलिफंटाकडे जात असताना उरण, कारंजाजवळ ही दुर्घटना घडली आहे. या बोटीत केवळ ८० ते ८५ प्रवाशांची क्षमता असताना, यामध्ये १०० पेक्षा जास्त प्रवासी भरण्यात आले होते, असे सांगण्यात आले. तर प्रारंभी तीन प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आली होती. मात्र ही धडक इतकी मोठी होती की, हा आकडा अवघ्या काही तासात १३ वर पोहोचला.

नीलकमल या बोटीला उरण, कारंजाजवळ स्पीड बोटची समोरून धडक बसली. नौदलाने तातडीने बचावकार्य हाती घेतले. काहींना जेएनपीटी हॉस्पिटल आणि काहींना जॉर्ज हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. अपघात होताच तटरक्षक दल आणि सागरी पोलिसांच्या समन्वयाने नौदलाने तातडीने शोध आणि बचाव कार्य सुरू केले. चार नौदल हेलिकॉप्टर, ११ नौदल क्राफ्ट, एक तटरक्षक नौका आणि तीन सागरी पोलिस नौका बचावकार्य करत आहेत. आतापर्यंत ९९ जणांना वाचवण्यात यश आले आहे, अशीही माहिती नौदलाने दिली आहे.

का झाला अपघात?
या अपघाताबद्दल माहिती देताना नौदलाने सांगितलं की, इंजिनाची चाचणी करत असलेल्या नौदलाच्या या बोटीचे नियंत्रण सुटले. आणि त्यानंतर कारंजा, मुंबई येथे नीलकमल या प्रवासी फेरीला ती स्पीडबोट धडकली. या दुर्घटनेत १ नौदल कर्मचारी आणि नौदलाच्या क्राफ्टमधील २ OEM सह १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्री काय म्हणाले?
या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, स्पीड बोटीचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला आहे. यामध्ये तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. ज्यांना वाचवलं आहे त्यांच्यावर तात्काळ उपचार करण्यात येतील. तर मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून पाच लाखाची मदत जाहीर करण्यात आली आहे. नौदलाचे व्हाईस ॲडमिरल संजय जगजित सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, नौदलाच्या डॉक्टरांनी सायंकाळी ७.३० पर्यंत १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यात ३ नौदलाचे जवान असून १० नागरिक आहेत. 

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"