विधान परिषदेसाठी भाजपकडून तीन उमेदवारांची नाव जाहीर!

माधव भंडारी यांचा पुन्हा पत्ता कट
मुंबई : महाराष्ट्रात विधान परिषदेच्या पाच जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. यात भाजप सर्वाधिक तीन जागा लढवणार आहे. भाजपच्या केंद्रीय कार्यालयाकडून आज विधान परिषदेसाठी तीन उमेदवारांची नाव जाहीर करण्यात आली आहेत. संदीप जोशी, संजय किनीकर आणि दादाराव केचे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. भाजपाचे माजी प्रवक्ते माधव भंडारी यांचा पुन्हा पत्ता कट करण्यात आला आहे. उद्या अर्ज दाखल करायचा आहे.
संदीप जोशी हे नागपूरमधून येतात. ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. संजय किनीकर हे छत्रपती संभाजीनगरमधून येतात. त्यांनी पक्षाचे महामंत्री म्हणून उत्तम काम केलेलं आहे. दादाराव केचे यांना विधानसभेच्यावेळी तिकीट नाकारण्यात आलं होतं. म्हणून त्यांची आता विधान परिषदेवर वर्णी लागली आहे. विधान परिषद पोटनिवडणुकीत भाजपच्या वाट्याला तीन जागा आल्या आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रत्येकी एक जागा लढवणार आहे.