फक्त मुद्द्याचं!

19th April 2025
महाराष्ट्र

कडाक्याची थंडी; अवकाळीचा मुक्काम डिसेंबरपर्यंत; हवामान विभागाचा अंदाज

कडाक्याची थंडी; अवकाळीचा मुक्काम डिसेंबरपर्यंत; हवामान विभागाचा अंदाज


नवी दिल्ली : यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्यानंतर आता यंदाचा हिवाळासुद्धा नागरिकांना सुखद गारवा देणारा ठरणार आहे. नोव्हेंबर ते जानेवारी या तीन महिन्यांत देशात ‘थंडा थंडा कुल कुल’ अशी परिस्थिती राहणार असून मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात कडाक्याची थंडी राहील, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.

दिवसा कमाल तापमानाचा पारा चांगलाच वाढणार असून, रात्री मात्र किमान तापमानात सरासरीपेक्षा जास्त घट राहील, अशी माहिती हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी दिली. यंदाचा पावसाळा हा देशात सर्वत्र चांगला राहिला. जून ते सप्टेंबरपर्यंत देशात सरासरीपेक्षा ७.५ टक्के अधिक पाऊस झाला. मध्य भारतात सर्वाधिक पावसाची नोंद झाली. आता नोव्हेंबर ते जानेवारी या तीन महिन्यांत मध्य भारतात किमान तापमानात सरासरीपेक्षा जास्त घट राहील. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्रात कडाक्याची थंडी राहील. मात्र, कमाल तपामानात वेगाने वाढ होऊन ते सरासरीपेक्षा जास्तच राहील, असेही त्यांनी सांगितले.

ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये ‘ला निना’ वादळाचा प्रभाव सक्रिय होण्याच्या शक्यतेमुळे तीव्र हिवाळ्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ऑक्टोबर महिन्यातच ‘ला निना’चा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे. जर ‘ला निना’चा प्रभाव ऑक्टोबरमध्ये सक्रिय झाला तर डिसेंबर आणि जानेवारीत तापमानात लक्षणीयरित्या घट होऊ शकते.

देशात अवकाळी पावसाचा मुक्काम डिसेंबरपर्यंत राहणार असून, तो ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यापासूनच सुरू होणार आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांत ११५ टक्के, तर फक्त ऑक्टोबर महिन्यात ११२ टक्के पाऊस राहील. जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान, उत्तराखंड या भागांत सरासरीपेक्षा कमी पाऊस राहील, असा अंदाजही त्यांनी वर्तवला.
ऑक्टोबर महिना सुरुवात झाल्यापासूनच आता अंगाची लाहीलाही होण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवारी मुंबईत तापमान ३३ अंशापर्यंत गेले होते. त्यातच किमान तापमानही जास्त असल्याने तसेच आर्द्रतेचे प्रमाण ८१ टक्क्यांवर पोहोचल्याने अंगातून घामाच्या धारा निघत होत्या. १० ऑक्टोबरनंतर राज्यातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाल्यास, कमाल तापमानात आणखी वाढ होणार आहे. दिवसा उन्हाचा कडाका, तर रात्री थंडी चागलीच जाणवणार आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"