कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंना मोठा दिलासा; न्यायालयाकडून शिक्षेला स्थगिती

नाशिक : नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने मुख्यमंत्री कोट्यातून दिल्या जाणाऱ्या सदनिका लाटल्या प्रकरणात कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना १ लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. तसेच त्यांच्या दोन वर्षांच्या शिक्षेला अपीलावरची कारवाई सुरु असेपर्यंत तात्पुरती स्थगिती देण्यात आल्याची माहिती माणिकराव कोकाटे यांचे वकील अविनाश भिडे यांनी माध्यमांशी बोलतांना दिली आहे.
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे व त्यांचे बंधू विजय कोकाटे यांनी मुख्यमंत्री कोट्यातून दिल्या जाणाऱ्या सदनिका या बनावट दस्तऐवज तयार करून लाटल्या प्रकरणात प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा नाशिक जिल्हा न्यायालयाने ठोठावली होती. त्यामुळे मंत्री कोकाटेंचे मंत्रिपद जाणार की राहणार? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली होती. त्यानंतर आता या प्रकरणात कोकाटे बंधूंना मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, नाशिक जिल्हा न्यायालयाने कोकाटेंच्या स्थगितीवरती आज निकाल दिला असला तरी उद्या सरकारी वकिलांनी बाजू मांडल्यानंतर पुढील निर्णय होणार असल्याचे कोकाटे यांचे वकील अविनाश भिडे यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.