आयजीबीसी ग्रीन चॅम्पियन पुरस्काराने भारत फोर्जचा सन्मान!

बेंगळुरू : भारतातील प्रमुख उत्पादन क्षेत्रातील आघाडीचे उद्योग आणि उच्च कार्यक्षमता व नावीन्यपूर्ण आवश्यक घटकांच्या जागतिक पुरवठादार भारत फोर्ज लिमिटेडला शाश्वततेबद्दलच्या वचनबद्धतेसाठी बेंगळुरू येथील बेंगळुरू इंटरनॅशनल एक्झिबिशन सेंटर येथे आयोजित ग्रीन बिल्डिंग कॉंग्रेस 2024 मध्ये प्रतिष्ठित आयजीबीसी ग्रीन चॅम्पियन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या मानाच्या पुरस्काराने गावे आयजीबीसी प्रमाणित ग्रीन व्हिलेजमध्ये रूपांतरित करण्याच्या भारत फोर्जच्या पथदर्शी प्रयत्नांची दखल घेतली आहे.
सीएसआर उपक्रमाचा भाग म्हणून, भारत फोर्जने 108 गावांमध्ये पिण्याचे पाणी, जलाशय आणि शेतीसाठी सिंचन सुविधा, आरोग्यसेवा, आधुनिक शैक्षणिक पायाभूत सुविधा, सेंद्रिय शेती, पशुधन व्यवस्थापन, जैवविविधता संरक्षण, पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण व ऊर्जा कार्यक्षम उपाययोजनांसह अनेक सुधारणा केल्या आहेत.
या प्रयत्नांच्या प्रमुख यशामध्ये 2,625 टीएमसी पाण्याचे संवर्धन, 2,16,215 लोकांना लाभ, 80 किमी रस्त्यांची बांधणी, 764 शेतकऱ्यांचे प्रशिक्षण, 34 शेळी शेड्सची उभारणी, 7 टेलीमेडिसिन केंद्रांची स्थापना, 5,800 महिलांसाठी कॅन्सर तपासणी शिबिरे, 12 प्राथमिक आरोग्य केंद्रांचे उन्नतीकरण, 42 जिल्हा परिषदेच्या शाळांचे नूतनीकरण, 2,37,000 झाडांची लागवड, 469 किलोवॅट अक्षय ऊर्जा पायाभूत सुविधा उभारणी आणि 1,500 विद्यार्थ्यांना पर्यावरणाबद्दल जागरूक करणे आदींचा समावेश आहे. या विविध शाश्वत उपक्रमांद्वारे भारत फोर्जने ग्रामीण भारतातील जीवनमानात महत्त्वपूर्ण सुधारणा घडवू आणली आहे आणि शाश्वततेचा ठसा निर्माण केला आहे. धामनेर, सायगाव, रुई, टाकळे, नागझरी आणि टाकगाव ही गावे आधीच प्रतिष्ठित IGBC ग्रीन व्हिलेज प्रमाणपत्र प्राप्त गावे ठरली आहेत.
उद्योगांतील लीडर्स आणि नवोन्मेषकांसाठी यंदाच्या ग्रीन बिल्डिंग कॉंग्रेस 2024 च्या 22व्या आवृत्तीत ‘इमारती आणि बांधकाम पर्यावरणामध्ये नेट झीरोला प्रोत्साहन’ या विषयावर एक प्रमुख व्यासपीठ केंद्रित होते. भारत फोर्जच्या वतीने डॉ. लीना देशपांडे, असोसिएट व्हाइस प्रेसिडेंट एचआर आणि सीएसआर प्रमुख यांनी हा प्रतिष्ठित पुरस्कार स्वीकारला. या शानदार समारंभाला विविध उद्योगांतील मान्यवर उपस्थित होते, ज्यामध्ये आयजीबीसीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. बी. थियागराजन, आयजीबीसीचे असोसिएट काउन्सिलर श्री.विक्रम सिंग, ग्रीन बिल्डिंग काउन्सिल ऑफ ऑस्ट्रेलियाचे प्रमुख जेफ ओटमन, महाराष्ट्र राज्य परिषदेचे अध्यक्ष श्री.बी. थियागराजन, जॉन्सन कंट्रोल्स इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अरुण अवस्थी आणि सीआयआय तेलंगणाचे अध्यक्ष श्री.सी. शेखर रेड्डी यांचा समावेश होता.
या प्रसंगी डॉ. लीना देशपांडे म्हणाल्या, भारत फोर्जमध्ये आम्ही आमच्या समाजात शाश्वत विकास सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहोत. हा उपक्रम आमचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री.बाबा कल्याणी आणि उपाध्यक्ष व संयुक्त व्यवस्थापकीय संचालक श्री.अमित कल्याणी यांच्या व्यापक दृष्टीचा एक भाग आहे, ज्यांनी नेहमीच एक हरित, आरोग्यपूर्ण आणि सर्वांसाठी समान भविष्य घडविण्याची संस्कृती प्राधान्याने पुढे नेली आहे. आयजीबीसी ग्रीन चॅम्पियन पुरस्कार मिळाल्याचा आम्हाला अभिमान आहे. या दिशेने आमच्या अविरत प्रयत्नांचा हा सन्मान आहे.