Kurla BEST accident: बस थांबवून चालकाने खरेदी केली दारूची बाटली

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : कुर्ला परिसरात सोमवारी रात्री झालेल्या बेस्टच्या भीषण अपघातात ७ लोकांचा मृत्यू झाला आणि ४८ लोक जखमी झाले. अपघातापूर्वी अंधेरी पश्चिमेत ओशिवरा भागात बेस्ट बस चालकाने वाईट शॉपजवळ बस थांबवून मद्य विकत घेतानाचा व्हिडिओ मनसेकडून शेअर करण्यात आला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शेअर केलेल्या व्हिडिओमुळे एकूण या प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले आहे. मनसेचे वर्सोवा विधानसभा विभा अध्यक्ष संदेश देसाई यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. ऑन ड्यूटी चालक वाहन चालवत असताना, प्रवासी बसमध्ये बसलेले ठेवून ते रस्त्याच्याकडेला थांबवून वाईन शॉपमध्ये जातो आणि दारूची बाटली विकत घेतो, तसेच पुन्हा येऊन सीटवर बंसतो. हे सीसीटिव्हीच्या चित्रीकरणात स्पष्ट झाले आहे. अंधेरी पश्चिमेत ओशिवरा भागात त्याने बेस्ट बस वाईन शॉपच्या समोर थांबविलेले कॅमेरामध्ये दिसले आहे. त्यामुळे अशा चालकाच्या विरोधात काय कारवाई करणार, असा सवाल मनसेने केला आहे.
चालकाला अपुरे प्रशिक्षण
चालकाला अपुरे प्रशिक्षण मिळाल्याचे तपासात दिसून आले आहे. हा चालक पूर्वी मिनीबसवर काम करत होता. कुर्ल्यासारख्या अत्यंत गजबजलेल्या परिसरात अशा प्रकारे भरधाव बस घुसल्यानंतर एकच हलकल्लोळ माजला. १२ मीटर लांब असलेली बस फक्त तीन दिवसाच्या प्रशिक्षणानंतर या चालकाने चालविण्यासाठी हातात घेतली होती. खरेतर, बेस्टच्या नियमित चालकांना दीड महिन्यांच्या पूर्ण प्रशिक्षणानंतरच मोठी बस चालविण्यासाठी कर्तव्यावर रुजू करून घेतले जाते.