मोकळ्या सिलेंडर मध्ये गॅस भरताना छापा!

मोरया गॅस सर्व्हीस संत तुकाराम नगर येथील घटना
पिंपरी: भरलेल्या गॅस सिलेंडर टाक्यांमधून मोकळ्या गॅस सिलेंडर टाक्यांमध्ये विनापरवाना भरत असताना भोसरी पोलिसांनी छापा मारून 16300 किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे .ही घटना मोरया गॅस सर्विस संत तुकाराम नगर या दुकानांमध्ये बुधवार 17 डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली.
मारुती व्यंकटी जायभाय (वय 39 ,पोलीस शिपाई ,भोसरी पोलीस ठाणे) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. सागर सोमनाथ चौधरी (वय 30, रा. आदिनाथ नगर ,समता मित्र मंडळाजवळ गव्हाणे वस्ती, भोसरी, मूळ पत्ता मूपोझरे ता. करमाळा, जि. सोलापूर )असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोरया गॅस सर्विस संत तुकाराम नगर येथील दुकानात गॅस चोरी होत असलेली माहिती भोसरी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार भोसरी पोलिसांनी छापा टाकून ही कारवाई केली. नागरिकांच्या जीवितास धोका होईल अशा प्रकारे भरलेल्या गॅस सिलेंडर मधून मोकळ्या सिलेंडर मध्ये गॅस भरला जात असताना कारवाई करण्यात आली .यावेळी 16 हजार 300 रुपये किमतीचे मुद्देमाल मिळून आला. आरोपीस अटक करण्यात आलेली नाही. भोसरी पोलीस तपास करत आहेत .

पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एका व्यक्तीस केली अटक!
पिंपरी :मनाई हुकूम असताना अवैधरित्या आदेशाचा भंग करून देशी बनावटीचे एक पिस्तूल (देशी कट्टा व तीन राऊंड )जवळ बाळगल्याने पोलिसांनी एका व्यक्तीस अटक केली आहे. ही घटना बुधवार १७ डिसेंबर रोजी दुपारी पावणे एकच्या सुमारास डेरी फार्म ते मुंबई पुणे जाणारे हायवे रोडच्या कडेला, पाण्याच्या टाकी शेजारी घडली.
दीपक भिमराव तांदळे पोलीस शिपाई, गुन्हे शाखा ,युनिट एक, पिंपरी चिंचवड )यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अभिषेक राजेंद्र यादव (वय 21, रा. शिंदे आळी, नवमहाराष्ट्र शाळेसमोर जाधव वडापाव पाठीमागे, पिंपरी गाव, मूळ रा. रदगाहापुरा ,मुक्ती ठाणा, जि. प्रयागराज ,उत्तर प्रदेश )असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एक व्यक्ती या परिसरात पिस्तूल घेऊन फिरत असल्याचे समजल्याने ही कारवाई करण्यात आली. सध्या निवडणूक आचारसंहिता असल्याने घातक शस्त्र जवळ बाळगणे हा गुन्हा आहे. या आदेशाचा भंग केल्याने कारवाई करण्यात आली. आरोपीकडे देशी बनावटीचा एक पिस्तूल (देशी कट्टा व तीन राऊंड) असा एकूण 53 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत पिंपरी पोलीस पुढील तपास करत आहेत.

