उत्तराखंडमध्ये सलग तिसऱ्या दिवशी हिमस्खलन

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली (वृत्तंसस्था) : सलग तिसऱ्या दिवशी शुक्रवारी उत्तराखंडमध्ये हिमस्खलन झाले आहे. तर उत्तर भारतातील काही भागात मुसळधार हिमवृष्टीही झाली आहे. या हिमस्खलनात ४१ कामगार जिवंत गाडले गेले आहेत तर जम्मूमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे.
उत्तराखंडमध्ये हिमस्खलनात ४१ कामगार जिवंत गाडले असून जम्मूमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी उत्तर भारतातील काही भागात मुसळधार हिमवृष्टी आणि पावसामुळे मुख्य रस्ते तुटले. हिमाचल प्रदेशच्या उंच भागात पुन्हा हिमस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे. शुक्रवारी तिसऱ्या दिवशीही जम्मू आणि हिमाचल प्रदेशात पावसाने थैमान घातले, ज्यामुळे अनेक जिल्ह्यांमधील शाळा बंद ठेवण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.
पावसामुळे पंजाब आणि हरियाणाच्या बहुतेक भागात तापमानाचा पारा घसरला आहे. उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील माना या उंचावरील सीमावर्ती गावाजवळ झालेल्या हिमस्खलनात बीआरओचे ४१ कामगार अडकले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. हिमस्खलनात सुरुवातीला ५७ लोक गाडले गेले होते परंतू १६ जणांना वाचवण्यात यश आले. बद्रीनाथपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेले माना हे भारत-तिबेट सीमेवरील ३,२०० मीटर उंचीवरील शेवटचे गाव आहे.
बनाला येथे भूस्खलनामुळे मनाली-किराटपूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. दरड कोसळत असल्याने दुरुस्तीचे काम अद्याप सुरू झालेले नाही, असे पोलिसांनी सांगितले. कुल्लूमध्ये मुसळधार पावसाने आखाडा बाजार आणि गांधी नगर जलमय झाले. सोलांग नाला, गुलाबा, अटल बोगदा आणि रोहतांग येथे नवीन बर्फवृष्टी झाल्यामुळे प्रशासनाने नेहरू कुंडच्या पलिकडे वाहनांची वाहतूक प्रतिबंधित केली आहे. शिवबाग येथे 113.2 मिमी, भुंतर 113.2 मिमी, बंजार 112.4 मिमी, जोगिंदरनगर 112 मिमी, सलूनी 109.3 मिमी, पालमपूर 99 मिमी आणि चंबा 97 मिमी पावसाची नोंद झाली आहे.