भारतीय सिनेमा हा वैश्विक सेतू

रॉबर्ट कॉनोली यांचे आंतरराष्ट्रीय कथाकथनामध्ये इफ्फीच्या भूमिकेचे केले कौतुक
फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
गोवा : ऑस्ट्रेलियातील प्रेक्षक मोठ्या संख्येने भारतीय चित्रपट पाहतात, भारतीय सिनेमा हा वैश्विक सेतू आहे. आम्ही सिनेमाद्वारे भारताबद्दल शिकतो, अशी भावना ऑस्ट्रेलियातील दिग्दर्शक, लेखक रॉबर्ट कॉनोली यांनी व्यक्त केली. आपल्या भाषणात त्यांनी इफ्फीच्या भूमिकेचेही कौतुक केले.
ऑस्ट्रेलियन सिनेमात दिसणारी जीवंतता आणि आधुनिकता साजरी करण्यासाठी गोवा इथे सुरू असलेल्या ५५ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात – इफ्फीमध्ये “कंट्री फोकस: ऑस्ट्रेलिया” विभागामध्ये फोर्स ऑफ नेचर: द ड्राय 2 ही फीचर फिल्म प्रदर्शित केली. या चित्रपटाचे दिग्दर्शक, लेखक आणि निर्माता रॉबर्ट कॉनोली यांनी आज गोव्यात प्रसार माध्यमातील प्रतिनिधींबरोबर संवाद साधला.
या चित्रपटाच्या कथानकामध्ये पाच महिलांना एका दुर्गम प्रदेशात पाठवण्यात येते, परंतु त्यापैकी फक्त चारच महिला परत येतात. त्या हरवलेल्या महिलाचा शोध घेण्यासाठी फेडरल पोलिस एजंट ॲरॉन फॉक तिथे येतात आणि सखोल चौकशी करतात. पोलिस उत्तरे शोधत असताना, तिथल्या अतिशय खडकाळ, ओबड-धोबड परिसरामध्ये त्याला आपल्या लहानपणीच्या दफन केलेल्या आठवणी पुन्हा जाग्या होवू लागतात. आता तिथे खरोखर काय घडले होते, या रहस्य गुंफण म्हणजे हा चित्रपट आहे.
उत्कृष्टपणे चित्रण केलेल्या या सिनेमामध्ये न्याय, कौटुंबिक निष्ठा आणि भूतकाळामध्ये सोसलेले भावनिक प्रसंग मनाचा ठाव घेणारे आहेत. हा एक आकर्षक रहस्यपट असून ग्रामीण ऑस्ट्रेलियाची पार्श्वभूमी त्याला लाभली आहे. अतिशय समृध्द पात्र रचना, वेगाने पुढे जाणारे कथानक असून, त्यामध्ये तणावपूर्ण तपासाचे मिश्रण घडवून आणते.
सिनेमाद्वारे हवामान बदलासारख्या जागतिक समस्यांना संबोधित करण्याच्या विषयावर, दिग्दर्शकाने या समस्येचे महत्त्व मान्य करून सांगितले की, “हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि उदयोन्मुख चित्रपट निर्मात्यांनी हवामान बदलाच्या प्रभावावर प्रकाश टाकणारे चित्रपट तयार करण्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. “समारोप करताना त्यांनी भारतीय सिनेमाची जागतिक पोहोचही वाढत आहे, यावर प्रकाश टाकला. ऑस्ट्रेलियातील प्रेक्षक मोठ्या संख्येने भारतीय चित्रपट पाहतात, असेही त्यांनी नमूद केले. दिग्दर्शकाने इफ्फीविषयी सांगितले की, “जगभरातील काही रोमांचक कथा तयार करण्याचा पाया इफ्फीने घातला आहे.’’