मुलांना फोन देण्याचं योग्य वय कोणतं?

फक्त मु्द्द्याचं न्यूज नेटवर्क
स्मार्ट फोनच्या बदलत्या फीचर्सबरोबर मोठी होणारी पिढी आपल्या आसपास सध्या आहे. या पिढीच्या जन्मापासूनच एका हातात खेळणं आणि एका हातात मोबाईल मिळाला आहे. त्यामुळे मोबाईल ही आयुष्यातली महत्त्वाची आणि आवश्यक वस्तू आहे, असा समज त्यांनी करून घेतला आहे. आयुष्यात प्रत्येक गोष्टीचा संबंध याच वस्तूशी असल्याचे दाखले त्यांना घरातच मिळत असल्यामुळे लहान मुलांच्या हातातून फोन काढून घेणे ही खूप अवघड गोष्ट आहे. मग नेमकं कोणत्या वयात मुलांच्या हातात फोन द्यायचा? त्यांचा स्क्रीनटाइम किती ठेवायचा, असे प्रश्न सतत पालकांना पडत असतात.
लहान मुलं तंत्रज्ञानाशी जोडली जात आहेत, पण सोबतच त्यांच्या मानसिक, शारीरिक आणि सामाजिक विकासावर त्याचा काय परिणाम होतो, हे समजून घेणं आवश्यक आहे. म्हणूनच योग्य वयात मोबाइल फोन द्यावा आणि त्यासाठी स्क्रीन टाइमिंगच्या स्पष्ट नियमांचा अवलंब करावा का, हे समजावून घेणं प्रत्येक पालकासाठी महत्त्वाचं आहे. विशेषज्ञांच्या मते, २ ते ५ वर्षांच्या वयोगटात बाळांना मोबाइल फोन न देण्याचा सल्ला दिला जातो. या वयात मुलं खेळण्यात, शारीरिक एक्टीव्हीटीमध्ये आणि संवाद साधण्यात अधिक सक्रिय असावीत. त्यामुळे, यावेळी त्यांच्या मानसिक विकासावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे.
मुलं फोन का घेतात?
लहानपणापासून मुलं घरात एक निरीक्षण करतात की, वडील, आई, घरातले आजी – आजोबा ही सगळी माणसं कोणत्या ना कोणत्या कामासाठी सतत फोन वापरतात. मोठे ताई दादा सुद्धा घरातल्यांना फोन किंवा काहीजणांना कळत्या वयात स्वतंत्र फोनही दिला जातो. या सगळ्याचं बारीक निरीक्षण लहान मुलं करतात. त्यामुळे आता फोन हा आपल्यासुद्धा आयुष्याचा एक महत्वाचा भाग झाला आहे, अशी समजूत मुलांनी करून घेतली आहे. स्मार्ट फोनमधून शिकण्यासारख्या अनेक गोष्टी असतात. पण त्या मुलांच्या हातात नेमक्या पडल्या पाहिजेत. त्याखेरीज नको असलेल्या काही गोष्टी त्यांच्या ज्ञानात भर पाडतील की काय या भीतीने पालक फोन देणं टाळतात. पण मलाही इतरांप्रमाणे फोन मिळालाच पाहिजे, ही भावना घरातल्या आजूबाजूच्या वातावरणामुळेच मुलांच्या मनात घर करून राहते आणि फोन ही गरजेचीच गोष्ट आहे, अशी धारणा ते करून बसतात.
मुलांना कधी गरज असते फोनची?
प्राथमिक शाळेच्या वयानंतर, विशेषतः ६ ते १२ वर्षांच्या वयोगटात, काही मुलांना स्मार्टफोनची आवश्यकता भासू शकते. त्याचा वापर सुद्धा अभ्यासापरत मर्यादित असावा. सोबतच त्यांच्यान शालेय कार्यासाठी, खासगी व सुरक्षित संवादासाठी, आणि आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधण्यासाठी मोबाईल उपयुक्त ठरू शकतो. परंतु, मोबाइल फोन देतानाच मुलाच्या व्यक्तिमत्व आणि गरजांचा विचार करणे महत्त्वाचे आहे.
याबाबतचं संशधोन असं सांगतं की, २ ते ५ वर्षांच्या मुलांसाठी स्क्रीन टाइमिंग एक तासापेक्षा जास्त नसावा. या वयात मुलांनी शारीरिक खेळ आणि इतर एक्टीव्हीटीमध्ये सहभागी होणे गरजेचे असते. ६ वर्षांनंतर, १ ते २ तासांच्या दरम्यान स्क्रीन टाइमिंग ठेवणे योग्य असू शकते, परंतु त्याचा वापर क्वालिटी कंटेंट पुरताच असावा. १८ महिन्यांच्या मुलांना फोनपासून दूर ठेवा. फोन किंवा टिव्ही स्क्रिनचा जास्त वापर केल्यानं मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. स्लिपिंग सायकल आणि फिजिकल एक्टिव्हीटीज बिघडतात.
स्क्रीन टाइमिंग केवळ वेळेपुरता मर्यादित न ठेवता, त्या वेळात पाहिला जाणारा कन्टेन्ट देखील महत्त्वाचा आहे. शिक्षणात्मक आणि विकासात्मक सामग्रीचा समावेश असलेले गेम्स, व्हिडिओ किंवा अॅप्स निवडणे अधिक फायदेशीर ठरते. पालकांनी मुलांच्या मोबाइल वापरावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.
मोबाईल वापरामुळे येणाऱ्या शारीरिक व्याधी
मुलांनी जास्त वेळ फोन वापरल्यास ब्रेन डेव्हलपमेंटवर परिणाम होतो. डोळे कमकुवत होतात, शरीराचे पोश्चर बिघडते, अभ्यासावर फोकस करू शकत नाहीत, सोशल इंट्रॅक्शनची आवड संपते, क्रिएटिव्हीटी कमी होते. स्क्रीन टाईम कमी केला तर मुलं बाहेर खेळतील आणि कुटुंबासोबत वेळ घालवतील. ज्यामुळे तुमचं आणि मुलांचे बॉन्डींग चांगलं होईल.
कुटुंबाला काय करता येईल?
स्क्रीन टाइमिंग आणि मोबाइल वापराच्या संदर्भात फॅमिली रुल्स ठरवणे महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ, जेवताना किंवा झोपताना घरातील कोणीच सदस्याने मोबाईल वापरू नये. शिवाय अभ्यासाच्या वेळेत मोबाइल फोन वापरण्यास मनाई असावी. यामुळे मुलांना एकत्रित संवाद साधण्याची संधी मिळते, तसेच त्यांच्या एकाग्रतेवरही सकारात्मक प्रभाव पडतो.