देहूरोड : पुणे शहर परिसरामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये गोळीबाराच्या आणि खुनाच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं दिसून येत आहे. अशातच जुन्या वादातून एकाने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मावळ मधील देहूरोडच्या गांधीनगर परिसरात जुन्या भांडणाच्या वादातून गोळीबाराची घटना घडली आहे. देहूरोड येथे वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू असताना सराईत गुन्हेगाराकडून हा गोळीबार करण्यात आला आहे.
या घटनेमध्ये एक जण गंभीर जखमी झाला होता. गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला देहूरोड येथील आधार हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचाराच्या दरम्यान त्याचा मृत्यू (Pune Crime News) झाला आहे. विक्रम गुरुस्वामी रेड्डी असे गोळीबारात मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. तर नंदकिशोर यादव याच्या चेहऱ्यावर मोठ्या जखमा झाल्या आहेत. गोळीबार केलेल्या आरोपींचा शोध सध्या देहूरोड पोलीस घेत आहेत.