लग्नसराईमुळे अर्थव्यवस्था होईल प्रवाही

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : भारतीय लग्नसोहळा हा आता संस्कारापेक्षा इव्हेंट या प्रकाराकडे अधिक झुकू लागला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात लग्नसराईचा हंगाम सुरू होताच, भारतीय अर्थव्यवस्था आणखी प्रवाही होण्यास मदत होणार आहे.
ऑक्टोबरचा महिना सुरू होताच पहिल्या आठवड्यापासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे. त्यानंतर लग्नसराईचा हंगाम सुरू होतो. ऑक्टोबरमधील सण आणि नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात देशभरात ४८ लाखांहून अधिक विवाह सोहळ्यांमुळे संपूर्ण अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. अलिकडे गेल्या काही वर्षांमध्ये भारतातील लग्नसोहळ्यांना इव्हेंटचे स्वरूप आले आहे. त्यामुळे रिसॉर्ट किंवा एखादे मोठे हॉटेल घेऊन बुकिंग करणे. चार दिवसांच्या मनोरंजक कार्यक्रमांची आखणी करणे, लग्नापूर्वीचे आणि लग्नानंतरचे विधी देखील साग्रसंगीत उत्सवाप्रमाणे साजरे करणे अशा सगळ्या पद्धती सुरू झाल्यामुळे याला पूर्वापार विवाहसंस्कारापेक्षा इव्हेंटचे स्वरूप आल्याचे म्हटल्याच वावगे ठरणार नाही. प्रि-वेडिंग फोटो शूटपासून लग्न सोहळ्यापर्यंत लाखांवर रुपये सहज खर्च केले जातात. सणासुदीचा हंगाम आणि लग्नसराई या दोन्ही प्रसंगामुळे ऑटोमोबाईल्स, ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, कपडे, दागिने, भेटवस्तू आणि खाद्यपदार्थांची मागणी वाढते आहे. याशिवाय सणासुदीत घरे आणि दुकानांच्या खरेदीतही वाढ होते.
भारतीय अर्थव्यवस्थेला सुगीचे दिवस
नोव्हेंबर महिन्यातील १२ तारखेपासून लग्नसराईचा हंगाम सुरू होत असून कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) च्या अहवालानुसार देशातील किरकोळ क्षेत्र (ज्यात वस्तू आणि सेवा दोन्हीचा समावेश आहे) या लग्नसराईच्या हंगामात ५.९ लाख कोटी रुपयांचा व्यवसाय करतील असे अपेक्षित आहे. देशभरात अंदाजे ४८ लाख विवाहसोहळ्यांसह आगामी हंगाम आर्थिक भरभरटीचा टप्पा ठरेल. गेल्या वर्षी ३५ लाख लग्नसोहळ्यासह एकूण व्यवसाय ४.२५ लाख कोटी रुपयांवर पोहोचला होता.
लग्नसराई कधीपर्यंत?
१६ डिसेंबर २०२४ पर्यंत लग्नमुहूर्त असून या कालावधीत देशभरात सुमारे ३५ लाख लग्नसोहळा पार पडतील असा अनेक अंदाज आहे. इतक्या विवाह सोहळ्यांमध्ये खर्च होणाऱ्या वस्तू आणि सेवांचे मूल्य ५.९ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकते ज्यामुळे केवळ बाजारालाच नव्हे तर संपूर्ण अर्थव्यवस्थेला नवीन चालना मिळेल. लग्नसोहळा प्रत्येक वर्गातील लोकांमध्ये होतो पण खर्चाचे प्रमाण वेगवेगळे असतात. काही लग्नांमध्ये कोट्यवधी रुपये उधळतात तर काही लग्न केवळ दोन-तीन लाख रुपयांमध्ये उरकले जातात. CAIT ने नमूद केले आहे की, यावर्षी बहुतेक भारतीय लग्नांमध्ये तीन ते १५ लाखांचा खर्च येऊ शकतो.