पिंपरीच्या जागेसाठी महायुतीत रस्सीखेच?

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान आमदार पिंपरी विधानसभेतून असल्यामुळे आता या जागेच्या मागणीसाठी शिंदे गट देखील हक्क दाखवित असल्याने महायुतीत पिंपरी विधानसभेसाठी रस्सीखेंच होणार असल्याचे चित्र दिसते आहे.
अजित पवार यांच्या गटाच्या वाट्याला असणाऱ्या पिंपरी विधानसभेच्या जागेची मागणी आता शिंदे गटाला देखील करायची आहे. शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी याबद्दल दावा केला आहे. महायुतीचा एकही आमदार कमी होऊ द्यायचा नाही, म्हणून पिंपरीच्या जागेवर शिंदे गटाचा उमेदवारच दिला पाहिजे, यासाठी खासदार बारणे आग्रही आहेत. विधानसभा जागा वाटपासाठी महायुतीच्या तीन प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत अजित पवार गटाच्या वाट्याला असणाऱ्या पिंपरी विधानसभेची मागणी शिंदे गट करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीत हा मुद्दा मांडतील असा दावा ही बारणेंनी केला आहे.
श्रीरंग बारणे काय म्हणालेत?
पिंपरी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा पारंपारिक मतदारसंघ आहे, आमच्याकडे सक्षम उमेदवार आहे, त्यामुळे हा मतदारसंघ आमच्याकडे राहावा. या निवडणूक महायुतीसाठी महत्त्वाची आहे, आमच्याकडे या जागेसाठी सक्षम उमेदवार असल्यामुळे आता ही जागा आम्ही खेचून आणेल असं त्यांनी म्हटलं आहे, तर आण्णा बनसोडेंच्या दाव्यावर म्हणाले, आधी ही जागा आम्ही लढली होती, राष्ट्रवादीच्या उमेदवाराप्रती मतदासंघात नाराजी आहे, त्यामुळे ही जागा शिवसेनेला मिळायला हवी, याबाबत मी मुख्यमंत्र्यांना देखील मी सूचित केलं आहे.
आण्णा बनसोडेंचे म्हणणे काय?
महायुतीच्या बैठकीत शिंदे गटाने पिंपरी विधानसभेची मागणी केली तरी अजित पवार ही जागा माझ्यासाठी घेणारच, याची खात्री बनसोडेंनी व्यक्त केली आहे. बनसोडेंबद्दल प्रचंड नाराजी असल्यानं ते पराभूत होतील आणि महायुतीचा एक आमदार कमी होईल. बारणेंचा हा दावा ही बनसोडेंनी खोडून काढला आहे. काहीही झालं तरी मीच पिंपरीमधून महायुतीचा उमेदवार असेन, असं बनसोडेंनी ठणकावून सांगितलं आहे. यानिमित्ताने महायुतीच्या बैठकीत या जागेवरून तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार म्हणून मी गेली पाच वर्षे काम करत आहे. ज्या पक्षाचे ज्या-ज्या ठिकाणी आमदार असतील, त्या ठिकाणी त्या पक्षाला ती उमेदवारी किंवा ती जागा सोडण्यात येणार आहे. पिंपरीसाठी अजित दादा आग्रही असतील असा माझा अंदाज आहे, त्यांना ती जागा सोडायचा निर्णय दादा घेतील असंही त्यांनी म्हटलं. राष्ट्रवादी काँग्रेसला ही जागा सुटणार आहे, असा विश्वास व्यक्त केला आहे.