नऊ दिवसात तब्बल दोन हजार अतिक्रमणे काढली!

पीएमआरडीएची धडक मोहीम ; जवळपास दोन लाख चौरस मीटरवरील अतिक्रमणे जमिनदोस्त
पुणे : पुणे शहराभोवती असणाऱ्या राष्ट्रीय, राज्यमार्गावरील अनधिकृत बांधकामावर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून धडक मोहीम राबविण्यात येत आहे. गत ९ दिवसात विविध भागातील अनधिकृत बांधकामांवर कारवाईमुळे जवळपास २ हजार अनधिकृत बांधकामे काढण्यात आल्याने साधारण दोन लाख चौरस मीटरवरील संबंधित रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. परिणामी संबंधित भागातील वाहतुक कोंडीचा प्रश्न निकाली निघत असल्याचे समाधान वाहनधारकांसह नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
पुणे शहरासह परिसरात काही दिवसापासून अनाधिकृत बांधकामांचे प्रमाण वाढत आहे. यामुळे रहदारीचा प्रश्न निर्माण होत असून नागरिकांसह वाहनधारकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पुणेकरांना वाहतूक कोंडीतून बाहेर काढण्यासाठी पीएमआरडीएसह राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पीएमसी, पीसीएमसी यांनी संयुक्तरित्या अनधिकृत बांधकामांवर कारवाईसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. ३ मार्चपासून सुरू झालेल्या या अतिक्रमणाविरुद्धच्या धडक मोहिमेत ११ मार्चपर्यंत (नऊ दिवसात) १ हजार ९९२ अनाधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे. यात एक लाख ९९ हजार दोनशे चौरस मीटरवरील अतिक्रमणे पथकाच्या माध्यमातून जमिनदोस्त करण्यात आली.
यात प्रामुख्याने वर्दळ असणाऱ्या राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमणे काढण्यावर भर देण्यात येत आहे. गत नऊ दिवसात पुणे नाशिक रोड, पुणे सोलापूर रस्ता आणि चांदणी चौक ते पौड रस्ता या भागातील अनधिकृत बांधकाम तसेच अतिक्रमणावर पथकाच्या माध्यमातून संबंधित कारवाई करण्यात येत आहे. या धडक मोहिमेदरम्यान काही अतिक्रमणधारक स्वतःहून आपले अतिक्रमणे काढून घेत प्रशासनास सहकार्य करत आहे. व्यवसायिकासह नागरिकांनी आपल्या हद्दीतच परवानगी घेऊन बांधकाम करावे असे आवाहन महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला, पोलिस अधिक्षक तथा दक्षता अधिकारी अमोल तांबे यांनी केले आहे.
पुणे शहरासह परिसरात वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने याची दखल घेत विशेष मोहीम आखून संबंधित अतिक्रमणे काढण्यात येत आहे. यामुळे निश्चितच आगामी काही दिवसात वाहनधारकांसह नागरिकांच्या रहदारीचा प्रश्न सुटेल असा विश्र्वास पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी व्यक्त केला.