अनुप मोरे भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष

पिंपरी, प्रतिनिधी : आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री अनुप मोरे यांची भाजयुमो महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षपदी निवड केली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महासचिव विक्रांत पाटील आणि प्रदेश सचिव राहुल लोणीकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांची निवड करण्यात आली आहे. मुंबई येथील भाजपाच्या प्रदेश कार्यालयात रविवारी प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चाची बैठक झाली. या बैठकीत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अनुप मोरे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करत असल्याबाबतची घोषणा केली. तसेच त्यांना निवडीचे पत्रही दिले. यावेळी विक्रांत पाटील, राहुल लोणीकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी बावनकुळे म्हणाले, भारतीय जनता युवा मोर्चाचा प्रत्येक कार्यकर्ता हा सक्षम आणि सजग असला पाहिजे. तळागाळातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत घटकापर्यंत पोहोचून शेवटच्या घटकापर्यंत भारतीय जनता पार्टीचे काम पोहोचविण्यासाठी त्याने प्रयत्नशील असावे. पंतप्रधान मोदींच्या योजना महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावेत.’
अनुप मोरे म्हणाले, ”युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा मिळाली आहे. तळागाळातील प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत पोहोचून त्याला न्याय देण्याचा सदैव प्रयत्न करेल. पक्षाशी असलेली बांधिलकी आणि युवकांच्या विकासाची जबाबदारी याची सांगड घालून नवमहाराष्ट्र घडवण्यासाठी मी अविरत कार्य करत राहणार आहे.”