पवना नदीकाठच्या भागांमध्ये सतर्कतेचा इशारा!

पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस
पिंपरी : पवना नदी काठच्या सर्व नागरीकांना सूचित करण्यात येत आहे, की सद्यस्थितीमध्ये पवना धरण 99.14% भरलेले असून आज सकाळी 9:00 वा. सांडव्याद्वारे नदीपात्रामध्ये होणाऱ्या विसर्गामध्ये वाढ होवून 1460 क्युसेक केला आहे. विसर्ग वाढले नंतर एकूण विसर्ग 2860 क्युसेक झाला आहे असे पवना धरण पूरनियंत्रण कक्ष,खडकवासला पाटबंधारे विभागाने कळविले आहे.

पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस पडत असून, येवा धरणात प्राप्त होत आहे. धरणातील पाणीसाठा नियंत्रित करणेकरिता पाणलोट क्षेत्रातील पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानुसार धरणातून नदीपात्रात होणारा विसर्ग टप्प्याटप्प्याने कमी किंवा जास्त केला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदी मधील पाण्याचे पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलवण्यात यावेत. सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात व सर्वांनी योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन पवना धरण पूरनियंत्रण कक्षाकडून केले आहे.
नदीकाठच्या भागांमध्ये सतर्कतेचा इशारा
मावळ, मुळशी आणि खेड परिसरामध्ये गेल्या २४ तासांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. चिंचवडमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. शहरातून पवना, इंद्रायणी आणि मुळा या तीन नद्या वाहतात. धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू आहे. नद्यांमधील विसर्ग वाढवण्यात आलेला आहे. त्यामुळे शहरातील नदीकाठच्या भागांमधील नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहेत. त्याचबरोबर महापालिकेच्या वतीने पूर नियंत्रणासाठी सज्जता ठेवली आहे. तसेच प्रभाग स्तरावर सजग राहण्याचे आदेश देण्यात आले आहे