पिंपरी चिंचवड शहरासाठी नाट्य संकुलाला अजित पवार यांच्याकडून ग्रीन सिग्नल!

पिंपरी चिंचवड नाट्य परिषद शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सत्कार समारंभ
पिंपरी : पिंपरी चिंचवड ही औद्योगिक ,कष्टकरी नगरी बरोबर सांस्कृतिक नगरी म्हणून झपाट्याने विकसित होत असून याचे संपूर्ण श्रेय पिंपरी चिंचवड नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांना जाते .त्यांच्या मागणीनुसार पिंपरी चिंचवड शहरात नाट्य संकुल उभारण्यास आपण उत्सुक असून महापालिका आयुक्तांची त्यांनी जागेसंदर्भात चर्चा करावी अशी सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. पिंपरी चिंचवड नाट्य परिषद शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सत्कार समारंभात अजित पवार बोलत होते.

या कार्यक्रमास अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मध्यवर्ती संघटना मुंबईचे विश्वस्त अशोक हांडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष अजित पवार होते मात्र ते संमेलनाला उपस्थित राहू न शकल्यामुळे त्यांचा मध्यवर्ती शाखेचे विश्वस्त अशोक हांडे ,उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर आणि नियमक मंडळाचे सदस्य सुहास जोशी यांच्या हस्ते त्यांना स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले .
उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, संयुक्त महाराष्ट्राचा सुवर्णकलश आणणारे राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी कला व संस्कृती जपणाऱ्या कलाकारांना योग्य मान सन्मान दिला. राज्याची संस्कृती जपण्याचे काम कलाकारांनी केले. यशवंतराव चव्हाण यांचा आदर्श घेऊन आम्ही सांस्कृतिक क्षेत्राच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करीत आहोत. कलावंत साहित्यिकांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला जात आहे .राज्यकर्ते म्हणून ते आमचे कर्तव्य आहे. पुरस्कार मिळालेल्या सर्व कलावंतांचे त्यांनी अभिनंदन केले .पवार पुढे म्हणाले की मी ठरवून राजकारणात आलो नाही. माझ्या स्पष्ट बोलण्याने मी राजकारणात टिकणार नाही असे अनेकांचे मत होते .मात्र माझा हाच स्वभाव सामान्य जनतेला भावणार आहे याची मला सल्ला देणाऱ्यांना कल्पना नसावी .पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर हे सध्या वाहतूक कोंडीने गाजत आहे. ही कोंडी सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. शहरात उड्डाणपूल, मेट्रो ,रिंग रोड आणि राष्ट्रीय महामार्ग यांचे जाळे तयार करण्यात येत आहे. वाहतूक कोंडीचा सर्वांना त्रास होतो .वेळ वाया जातो .लवकरच यावर तोडगा निघेल असे अजित पवार म्हणाले.
पिंपरी चिंचवड नाट्य परिषदेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या जीवन गौरव पुरस्कारामध्ये कै. बालगंधर्व पुरस्कार – ज्ञानोबा पेंढारकर (ज्येष्ठ नाट्य संगीतकार), आचार्य अत्रे पुरस्कार – संकर्षण कर्हाडे (अभिनेता, कवी, लेखक ,निवेदक ),कै .अरुण सरनाईक पुरस्कार- प्रवीण दर्डे (अभिनेता ,लेखक ,दिग्दर्शक), कै स्मिता पाटील पुरस्कार- स्पृहा जोशी (कवियत्री ,अभिनेत्री, निवेदिका) कै. जयवंत दळवी पुरस्कार- अरविंद जगताप ( नाट्य, सिनेमा ,मालिका लेखक आणि ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित सुरेश साखळकर यांचा नाट्य परिषद मध्यवर्ती चा जीवनगौरव पुरस्कार मिळाल्या निमित्त यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच यानिमित्ताने सुवर्णा काळे ,रती देशमुख, संदीप , देशमुख ,संदीप उर्फ बबलू जगदाळे ,सोमनाथ तरटे, राष्ट्रीय खेळाडू प्रांजल जाधव यांचा विशेष सन्मान करण्यात आला. राज्य नाट्य स्पर्धा 2024 चे पुरस्कार विजेत्यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले .यामध्ये मनोहर जुवाटकर, कमलेश बीचे, विनायक परदेशी ,अथर्व कुलकर्णी, श्रुती भोसले, दिनेश साबळे यांचा समावेश आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाऊसाहेब भोईर यांनी केले यावेळी त्यांनी पुरस्कारामागील भूमिका आणि शहरात वाढत्या सांस्कृतिक चळवळीसाठी नाट्यसंस्कूल उभारण्यात यावे अशी मागणी त्यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चित्रा खरे यांनी तर सुवास जोशी यांनी आभार मानले पिंपरी चिंचवड शहराला नाट्य संकुलाची गरज अजित पवार