शरद पवार यांना सोडणं चुकच : अजित पवार

गडचिरोली : शरद पवार यांच्यातून बाहेर पडल्यामुळे अजित पवार यांना लोकसभेत अपयश आलं अशा चर्चा रंगल्या होत्या. परंतु आज खुद्द अजित पवार यांनी आपली चूक झाल्याची कबुली दिली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जन सन्मान यात्रा आज शनिवारी गडचिरोलीमध्ये दाखल झाली . आयोजित केलेल्या सभेमध्ये अजित पवार यांनी ही कबुली दिली. या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
मंत्री धर्माराव बाबा आत्राम यांची कन्या भाग्यश्री आत्राम यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. या मुद्द्यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, वडिलांचं जितकं लेकीवर प्रेम असतं तितकं प्रेम कुणीच करू शकत नाही. असं असताना तुम्ही जर घरात फुट पाडण्याचा प्रयत्न करत असाल तर हे बरोबर नाही. समाजाला सुद्धा ते आवडत नाही. याचा अनुभव आम्ही पण घेतलेला आहे. तसेच झालेली चूक सुद्धा मी मान्य केली आहे. अशी भावना अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.
अजित पवार पुढे म्हणाले की, धर्माराव बाबांच्या मुलीने दुसऱ्या पक्षात जाण्याचा विचार केला असून ती आता बाबांच्या विरोधात उभी राहणार असल्याची म्हणते. हे शोभतं का? वस्ताद सगळे डाव शिकवत असतो पण एक डाव स्वत:साठी राखून ठेवत असतो. तो डाव दाखवून देण्याची वेळ कधीही आणून देऊ नये.
अजित पवार म्हणाले की,आम्ही चांगल्या योजना जनतेला देण्याचा प्रयत्न केला आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 1 कोटी 60 लाख महिलांना 3 हजार रुपये वाटप करण्यात आले आहे. जे कोणी राहिले आहेत. त्यांनी सुद्धा अर्ज करावा असे आवाहन अजित पवार यांनी यावेळी केले.