विधानसभेआधीच महायुतीत धुसफूस

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : राज्यात विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसशी आपले आयुष्यभर पटले नाही. आता त्यांच्याबरोबर सत्तेत मांडीला मांडी लावून बसलो आहे. पण बाहेर आलो की उलट्या होतात, असे वादग्रस्त विधान राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांनी एका जाहीर कार्यक्रमात केले होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीआधी महायुतीमध्ये तणाव निर्माण झाला आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही त्यांना प्रत्युत्तर दिले असून सत्तेतून बाहेर पडलेले बरे, असा निर्वाणीचा इशारा राष्ट्रवादीकडून दिला आहे.
तानाजी सावंत यांच्या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी अजित पवार यांना सत्तेतून बाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे. “तानाजी सावंत यांचे ऐकून घेण्यापेक्षा महायुतीतून बाहेर पडू, आपल्याला सत्तेची गरज नाही. तानाजी सावंत यांचा आम्हाला बोलण्याचा काय अधिकार आहे? एकनाथ शिंदे यांना भाजपाने मुख्यमंत्री केले त्यामुळे तानाजी सावंत यांना मंत्रिपद मिळाले. त्याच भाजपाच्या नेत्यांनी अजित पवार यांना महायुतीमध्ये घेतले. हा निर्णय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाने घेतला होता. महायुतीमुळेच तानाजी सावंत मंत्री आहेत. हे त्यांनी विसरू नये. या पद्धतीने जर राष्ट्रवादीला कोण बोलणार असेल तर आम्ही सत्तेत राहणार नाही”, असा इशारा प्रवक्ते उमेश पाटील यांनी दिला.
काँग्रेसचा सहवास सहन होत नाही
धाराशिव येथे एका कार्यक्रमात बोलताना तानाजी सावंत म्हणाले की, मी हाडामासाचा शिवसैनिक आहे. आयुष्यात कधीही काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी माझे जमलेले नाही. शिक्षण घेत असल्यापासून मला त्यांचे पटलेले नाही. आज जरी मंत्रिमंडळात आम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलो असलो तरी बाहेर आल्यानंतर उलट्या होतात. हे सहन होत नाही.”
सावंतांचा इलाज करणे आवश्यक
विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले, ” सावंत राज्याचे आरोग्यमंत्री आहेत. त्यांना उलट्या कोणत्या कारणामुळे होत असाव्यात, याबद्दल कल्पना नाही. त्याचा आरोग्याशी काही संबंध असू शकेल. पण महायुतीत असल्यामुळे उलट्या होत असतील तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीच त्यांचा इलाज करावा.