जमिनीवर पाय घट्ट रोवलेला माणूस..

पिंपरी-चिंचवडमधील टाटा मोटर्सच्या प्लान्टवर रतन टाटा साहेब व्हिजिटसाठी आले की, हातात ताट घेऊन कामगारांच्या रांगेत उभे राहून जेवायचे आणि कंपनीच्या प्रथेनुसार नंतर स्वतःचे ताट उचलूनही ठेवायचे, हे मी स्वतः पाहिले आहे. पाय जमिनीवर घट्ट रोवून उभा राहिलेला माणूस उगाच नाही गगनचुंबी कामगिरी करून इतिहासाच्या पटलांवर आपलं नाव कोरून गेला… सांगताहेत टाटा मोटर्सचे निवृत्त सिनियर मॅनेजर किरण येवलेकर.
कालचा दिवस म्हणजे ९ ऑक्टोबर, उलटता उलटता एक अत्यंत दुःखद बातमी सगळ्या मीडियावर फिरू लागली; सगळ्या चॅनलवर दिसायला लागली आणि खरोखरच क्षणभर निःस्तब्ध झालो आणि अस्वस्थ ही!
सगळ्या क्षेत्रातील सामान्य ते उच्चभ्रू अशा सगळ्या जनमानसात, अत्यंत आदरणीय असलेले, देशात आणि आंतरराष्ट्रीय क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने आणि दातृत्वाने जगन्मान्यता प्राप्त झालेले उद्योगपती आणि त्याही पेक्षा मोठ्या मनाचा दिलदार माणूस, पद्मश्री, पद्मभूषण श्री रतन टाटा साहेबांचे निधन झाल्याचे कळाले, अन् माझ्या सारख्या अर्थात टाटा मोटर्समध्ये पूर्ण हयात घालवलेल्या , असंख्य टाटा कर्मचाऱ्यांच्या परिवारातीलच एक कर्ता पुरुष गेल्याचे दुःख झाले.
रतन टाटा साहेबांशी माझा प्रत्यक्ष जरी संबंध आला नसला, तरी टाटा मोटर्स कलासागरच्या विविध कार्यक्रमांमध्ये आणि विशेषतः जेआरडी टाटा साहेबांना भारतरत्न मिळाल्यानंतर कलासागर ने आयोजित केलेल्या जेआरडी टाटा साहेबांच्या वरील रांगोळ्यांच्या प्रदर्शनाला, जेआरडी साहेबांबरोबर रतन टाटा साहेब ही आले होते. त्यावेळचा त्यांचा मिस्कील स्वभाव हा सर्व कलाकार मित्रांना खूप भावला होता.
शिवाय मी इलेक्ट्रॉनिक्स डिव्हिजन मध्ये काम करत होतो. नवीन गाड्यांसाठी असलेले मॉडेल शॉप त्याच ठिकाणी असायचे. साहेबांच्या चेअरमनशिपच्या काळात त्यांची दर महिन्याला तेथे भेट व्हायची. या दरम्यान सामान्य कामगाराशी प्रत्यक्ष बोलताना आणि अगदी जवळून बघताना त्यांचे प्रेरणादायी व्यक्तिमत्व भुरळ पाडून जाई. अत्यंत साधा, स्वतः एका मोठ्या समूहाचे प्रमुख असल्याचा अभिनेवेश कधीही न दाखविता, सामान्य कामगारांबरोबर सहज संवाद साधणारा, असे त्यांचे व्यक्तिमत्व होते.
कामगारांच्या रांगेतूनच जेवणारा मालक
रतनजी टाटांबद्दलचे अनेक प्रसंग लोक सांगतात. त्यांच्या सहवासातील आठवणी आवर्जून मांडतात. मलाही आठवते की, टाटा मोटर्समध्ये व्हिजिटच्या वेळेस जेव्हा साहेब येत असत, तेव्हा अनेक वेळा त्यांना इतर सर्वसामान्य कामगारांबरोबर जेवणाच्या रांगेत उभे राहिलेले आणि कामगारांनाच दिले जाणारे जेवण घेतेलेले मी पाहिले आहे. इतकेच नव्हे तर टाटा मोटर्समधील एक प्रथा आहे. जेवण झाल्यावर प्रत्येकानं आपलं ताट उचलून ठेवायचं असतं. आमचे हे मालक असणारे व्यक्तिमत्व इथे सुद्धा कामगारांच्या बरोबर जेवण झाल्यावर तेथील प्रथेनुसार ताट उचलून ठेवत असत, हे मी प्रत्यक्ष बघितले आहे. त्यांचं हे पाय जमिनीवर असणं अर्थात, डाऊन टू अर्थ वागणं पाहूनच आम्ही भारावून जात असू. अशा आपुलकीच्या वातावरणात काम करायला कोणीही कामगार उत्सुक असे.
मला आला टाटांचा मेल
त्यांची प्रत्यक्ष ई-मेल मला मिळण्याचा योग माझ्या एका मित्रामुळे आला. श्री. सी. आर. होणकळस हे आमचे वयाने मोठे असलेले कलासागरचे जेष्ठ कलाकार. त्यांनी रतन टाटा साहेबांचा ॲल्युमिनियम मध्ये एक पुतळा (बस् ) बनविला होता . तो पुतळा त्यांना रतन टाटा साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना भेट देण्याची त्यांची इच्छा होती. त्यासाठी मी सर्व संदर्भ आणि छायाचित्रे देऊन रतन टाटा साहेबांना मेल केली होती. आश्चर्य म्हणजे, त्या मेलवर काही दिवसातच मला त्यांनी स्वतः उत्तर दिले.तसेच श्री. होणकळस यांचे अभिनंदन करून , भेटीची वेळ ठरविण्याबद्दल लिहिले होते . त्यात श्.री होणकळस यांना केव्हा वेळ मिळेल, ते कळवावे , असे सांगितले. एका मोठ्या उद्योग समूहाचा मालक असलेल्या या मोठ्या माणसाने सामान्य कामगाराला, त्याच्या सोयीनुसार भेटीची वेळ ठरवायला सांगणे, हे अत्यंत कौतुकास्पद आणि आश्चर्यकारक वाटावे असेच होते. अर्थात काही कारणाने त्यांना तो पुतळा भेट देण्याचे राहून गेले ,ही खंत अजूनही मनात राहील.
रतन टाटा हे केवळ टाटा परिवाराचे नाहीत, देशाचे नाहीत, तर संपूर्ण जगाचे एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या दातृत्वाचे तर किस्से सगळ्यांच्या मनात घर करून आहेत. नावाप्रमाणेच ‘रतन’ किंवा एखाद्या कोहिनूर हिऱ्यासारखे त्यांचे तेज, त्यांच्या कार्यामुळे सतत प्रेरणा देत राहील आणि भारताच्या समृद्धीसाठी त्यांनी केलेले योगदान हे कायम देशवासीयांच्या स्मरणात राहील ही खात्री आहे.
अशा या उत्तुंग व्यक्तिमत्वाला मनापासून अभिवादन!
लेखक – किरण येवलेकर
निवृत्त सिनियर मॅनेजर
टाटा मोटर्स, पुणे