कोण असतील भारताचे नवे उपराष्ट्रपती?

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रकृतीच्या कारणास्तव काल (सोमवार) रात्री तडकाफडकी आपल्या राजीनामा दिला आहे. त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिलेल्या पत्रात, ‘प्रकृतीला प्राधान्य देण्यासाठी वैद्यकीय सल्ल्याचे पालन करत मी संविधानाच्या कलम ६७(अ) नुसार तात्काळ भारताच्या उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा देत आहे’, असं म्हटलं आहे. धनखड यांच्यानंतर उपराष्ट्रपती कोण असेल आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडीची प्रक्रिया काय आहे ते जाणून घेऊयात.

भाजपाकडील अनुभवी नेता, केंद्रीय मंत्री किंवा राज्यपालांपैकी एकाची निवड या पदावर केली जाऊ शकते. जगदीप धनखड हे उपराष्ट्रपती होण्यापूर्वी पश्चिम बंगालचे राज्यपाल होते. ताज्या माहितीनुसार राष्ट्पती द्रौपदी मुर्मू यांनी धनखड यांचा राजीनामा मंजूर केला आहे.
त्यामुळे आता धनखड यांच्या राजीनाम्यानंतर राज्यसभेत सभापतींच्या खुर्चीवर विराजमान कोण होणार याची चर्चा सुरू आहे. सध्या राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह हे राज्यसभेचे प्रभारी सभापती म्हणून काम पाहणार आहेत. सध्याच्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात ते कार्यभार सांभाळणार आहेत.
शर्यतीत असलेल्या संभाव्य नावांमध्ये महाराष्ट्राची माजी मंत्री आणि राजस्थानचे सध्याचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे नाव आघाडीवर आहे. बागडे यांची या पदासाठी निवड झाली तर ते या पदावर पोहोचणारे पहिले महाराष्ट्रीय असतील. जनता दल (युनायटेड)चे खासदार आणि राज्यसभेचे उपसभापती हरिवंश हे देखील संभाव्य उमेदवार असू शकतात, अशी चर्चा आहे.

भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. त्यामुळे त्यांच्यावर राज्यसभेचे कामकाज पार पाडण्याची आणि कायदे बनविण्याची जबाबदारी असते. जर काही कारणामुळे राष्ट्रपती पद रिक्त झाले तर उपराष्ट्रपती हे त्यांची जबाबदारी सांभाळतात. आता धनखड यांच्या जागी भाजपच्या एखाद्या अमुभवी चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता आहे.
कोण मतदान करू शकतात?
उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीत फक्त लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार मतदान करता. यात नामांकित सदस्यांचाही समावेश असतो. उपराष्ट्रपतीची निवडणूक लढवण्यासाठी तो व्यक्ती भारताचे नागरिक असणे आवश्यक आहे. तसेच त्या व्यक्तीचे वय ३५ वर्षांपेक्षा जास्त असले पाहिजे. उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीला १५ हजार रुपयांचे डिपॉझिट भरावे लागते.

