बुलेट ट्रेनच्या कामाला वेग

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : मुंबई ते अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या बुलेट ट्रेनच्या कामाला गुजरात पाठोपाठ आता महाराष्ट्रातही वेग आला आहे. शनिवारी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुलेट ट्रेनच्या कामाची मुंबईत पाहणी केली.
मुंबईत बुलेट ट्रेनच्या कामाच्या पाहणीदरम्यान रेल्वेमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, कोलकात्याच्या नदीखालील बोगदा तुम्ही पाहिला आहे. त्याचप्रमाणे हा देशातील पहिला समुद्राखालील बोगदा आहे. बोगद्यातील बुलेट ट्रेन दोन्ही ट्रॅकवर एकाच वेळी २५० किमी प्रतितास वेगाने धावेल. अशी विशेष रचना करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. बोगद्यात बुलेट ट्रेन असेल तर ती आणखी वेगाने धावू शकते आणि या बांधकामादरम्यान अतिशय काळजीपूर्वक काम केले जात आहे, असेही त्यांनी नमूद केले.
एकूणच कामाची प्रगती चांगली असल्याचे वैष्णव यांनी नमूद केले. या बोगद्यातून बुलेट ट्रेन ताशी २५० किलोमीटर वेगाने धावणार असल्याचेही वैष्णव यांनी अधोरेखित केले. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉरची एकूण लांबी ५०८.०९ किलोमीटर आहे. तर गुजरातमध्ये बुलेट ट्रेनची चाचणी २०२६ मध्ये सुरत-बिलीमोरा दरम्यान शक्य असल्याचेही त्यांनी सांगितले.
३९४ मीटर लांबीचा ADIT बोगदा मे २०२५ मध्ये पूर्ण होणार आहे (६ महिने रेकॉर्ड वेळ). यामुळे शिळफाटा येथे अतिरिक्त उत्खननासाठी दोन अतिरिक्त NATM फेजची सुविधा उपलब्ध झाली आहे. या अतिरिक्त सोयीमुळे, बोगद्याचे १ हजार १११ मीटर (BKC/N1TM दिशेने १५६२ मीटरपैकी ६२२ मीटर आणि अहमदाबाद/N2TM दिशेने १६२८ मीटरपैकी ४८९ मीटर) काम पूर्ण झाले आहे.