पुण्यात मिळणार मतदानाचे प्रमाणपत्र

फक्त मुद्द्याचे न्यूज नेटवर्क
पुणे, प्रतिनिधी : कोणत्याही घटनेनंतर प्रमाणपत्र मिळाले की त्या गोष्टीला एक पूर्णत्व येते किंवा ती कायमस्वरूपी स्मरणात राहते. अनेकांना शालेय वयापासून मिळालेली प्रमाणपत्र सुद्धा फार जपून ठेवण्याची आवड असते. असेच एक प्रमाणपत्र आता पुणेकरांच्या हाती येणार आहे. येत्या २० तारखेला मतदानाचा हक्क बजावल्यानंतर संबंधित व्यक्तीने मतदान केले असल्याचे प्रमाणपत्र दिले जाणार असल्याची माहिती, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली आहे.
मतदारांचे पद्धतशीर शिक्षण व निवडणूक सहभाग (स्वीप) अंतर्गत जनजागृती करण्यात येत असते. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी या अंतर्गत हा प्रमाणपत्र देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर मिळणारे प्रमाणपत्र ही मतदारासाठी गौरवाबी बाब असेल. त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढण्यासही मदत होऊ शकते. जिल्ह्यातील सर्व पात्र मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी केले आहे.
कसे मिळेल प्रमाणपत्र?
- मतदारांना मतदान केल्याचे प्रमाणपत्र मिळावे यासाठी एक क्यूआर कोड तयार करण्यात आला आहे.
- त्याचे स्टीकर्स मतदारसंघांना वितरित करण्यात आले आहेत. मतदान केल्यानंतर त्या स्टीकरवरचा क्यूआर कोड स्कॅन करावा लागेल.
- त्यानंतर उघडणाऱ्या फॉर्ममध्ये आपली माहिती अचूक भरावी लागेल.
- तसेच मतदानाची शाई असलेल्या बोटासोबतचा सेल्फी अपलोड करावा.
- त्यानंतर फॉर्ममध्ये भरलेल्या ई-मेलवर आपले मतदान केल्याचे प्रमाणपत्र प्राप्त होणार आहे.